मुंबई : मुंबईकरांना भेडसावणाऱ्या पाण्याच्या समस्येपासून सुटका करण्यासाठी महापालिकेने मुंबईतील 12 विभागात 30 जानेवारी सकाळी 10 ते 31 जानेवारी सकाळी 10 पर्यंत पाणीपुरवठा पूर्णतः बंद केला होता. तर, दोन विभागात 25 टक्के पाणी कपात केली होती . त्यापाठोपाठ आता मुंबईतील काही विभागात 8 आणि 9 फेब्रुवारीला पूर्ण पाणी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या भागातील नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा असे आवाहनही मुंबई महापालिकेने केले आहे.
30 आणि 31 जानेवारीला भांडुप जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्तीच्या कामांमुळे पाणीकपात करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. आता 8 फेब्रुवारीला ट्रॉम्बे उच्च-स्तरीय जलाशयाच्या इनलेट व्हॉल्व्हच्या बदलीसह अन्य दुरुस्ती आणि देखभालीचे काम महापालिका करणार आहे. त्यामुळे पूर्व आणि पश्चिम मुंबईतील काही भागांत 8 ते 9 फेब्रुवारीदरम्यान सकाळी 10 ते सकाळी 10 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे.
एम पश्चिम आणि एम पूर्व या विभागात चेंबूर, गोवंडी, देवनार आणि मानखुर्द येथे पाणीपुरवठा बंद रहाणार आहे. या विभागातील नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा ठेवावा. तसेच, कपातीच्या काळात पाणी जपून वापरावे असे आवाहन महापालिकेने केले आहे. 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत असे 24 तास पाणी उपलब्ध होणार नाही.
2023-24 या वर्षात या कामासाठी 32 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. नुकत्याच सादर करण्यात आलेल्या महापालिकेच्या अंदाजपत्रकात मुंबईतील पाणीपुरवठा योग्य रीतीने व्हावा यासाठी अनेक सुधारित योजना मांडल्या आहेत.
भांडुप कॉम्प्लेक्स येथील सुमारे 44 वर्षांपूर्वी बांधलेला 1910 एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्पाचे आयुष्य संपत आले आहे. त्याठिकाणी प्रतिदिन नवा 2000 MLD पाणीपुरवठा करणारा नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प बांधण्यात येणार आहे. यासाठी ३५० कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
कुलाबा सीवरेज ट्रीटमेंट प्लांटमधील सांडपाणी पिण्यायोग्य पाण्यात रूपांतरित करण्यासाठी 12 एमएलडीचा पथदर्शी प्रकल्प राबविण्याची तयारी पाणीपुरवठा विभाग करत आहे. यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.