मेरा पती कहाँ है… घाटकोपर दुर्घटनेनंतर नातेवाईकांचा आक्रोश; राजावाडी रुग्णालयात गर्दी

| Updated on: May 13, 2024 | 8:18 PM

घाटकोपरच्या छेडा नगर येथील एका पेट्रोल पंपावर भलं मोठं होर्डिंग कोसळलं आहे. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. तर 35 जण जखमी झाले आहेत. या जखमींना घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच या होर्डिंगखाली तब्बल 100 लोक दबल्याची माहिती मिळत आहे. पोलीस, अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केलं आहे.

मेरा पती कहाँ है... घाटकोपर दुर्घटनेनंतर नातेवाईकांचा आक्रोश; राजावाडी रुग्णालयात गर्दी
Hoarding
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

घाटकोपरच्या छेडानगरमध्ये एका पेट्रोल पंपाजवळ भलं मोठं होर्डिंग्ज कोसळलं आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 56 लोक जखमी झाले आहेत. यातील 35 जखमींना घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 100 जण या होर्डिंग्ज खाली अडकले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत तिघे दगावले आहेत. पण होर्डिंग्ज महाकाय असल्याने ते हटवण्यासाठी क्रेन मागवण्यात आल्या असून रात्रभर हे बचावकार्य सुरू राहणार आहे. राजावाडी रुग्णालयात जखमींना नेण्यात आलं असून आपल्या कुटुंबातील सदस्याला भेटण्यासाठी राजावाडी रुग्णालयात एकच गर्दी झाली आहे. नातेवाईक आक्रोश करत असून टाहो फोडताना दिसत आहेत.

मुंबईत आज अचानक वादळी पावसाने हजेरी लावली. प्रचंड वारा वाहू लागल्याने मुंबईकरांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. वादळानंतर अचानक पावसाला सुरुवात झाली. यावेळी घाटकोपरच्या छेडा नगरजवळ पेट्रोल पंपाजवळ हे होर्डिंग होतं. हे भलं मोठं होर्डिंग अचानक पेट्रोल पंपावर कोसळलं. त्यामुळे एकच हाहा:कार उडाला. नागरिकांची एकच पळापळ उडाली. अचानक आलेल्या पावसामुळे अनेक जण या पेट्रोल पंपाच्या आश्रयाला आले होते. त्यांच्या अंगावर हे महाकाय होर्डिंग्ज कोसळलं. या होर्डिंग्जखाली किमान 100 लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबई महापालिकेनेही ही भीती व्यक्त केली आहे.

रिक्षा, कारचा चुराडा

हे होर्डिंग इतकं विशाल आणि जड होतं की या होर्डिंग्जखाली रिक्षा, कार आणि बाईक चेपल्या गेल्या. रिक्षांचा तर अक्षरश: चक्काचूर झाला आहे. रिक्षातील लोक या होर्डिंगखाली दबल्या गेल्याचं सांगितलं जात आहे. एकूण 10 ते 12 वाहने दबल्याचं सांगितलं जात आहे. पोलीस, अग्निशमन दल आणि एनडीआरएफचे जवान घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य करत आहेत.

घटनास्थळी मातम

दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच अनेकांनी आपल्या कुटुंबीयांना शोधण्याचा प्रयत्न केला. अगदी मुंब्र्याहूनही लोक आले होते. त्यांचा आपल्या कुटुंबीयांना शोधण्याचा प्रयत्न होत्या. एका बाईला तर अश्रू अनावर झाले होते. मेरा पती कहाँ है… असं ती सारखं विचारत होती. मेरा पती आया था… यहाँ काम के लिए आया था…, असं रडत रडत सांगतानाच होर्डिंगखाली तर नवरा दबला नाही ना? अशी भीतीही ही बाई व्यक्त करत होती.

धावत पळत आलो

आणखी एक जण आपल्या नातेवाईकाला शोधण्यासाठी मुंब्र्याहून आला होता. ते इंधन टाकण्यासाठी आले होते. मुंब्र्यातून आले होते. इंधन भरत असतानाच हा बोर्ड पडला. आता त्यांचा कॉल लागत नाही. नेटवर्क नाहीये. मला एका अनोळखी व्यक्तीने फोन केला. तुमची गाडी इथे उभी आहे असं त्याने सांगितलं. म्हणून मी धावतपळत आलो, असं या तरुणाने सांगितलं.

राजावाडीत टाहो

या दुर्घटनेनंतर तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं. तब्बल 35 जखमींना होर्डिंगमधून बाहेर काढण्यात आलं. या सर्वांना तात्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जखमींना रुग्णालयात नेल्याचं कळताच अनेकांनी राजावाडीत धाव घेतली. जखमींमध्ये आपला नातेवाईक तर नाही ना? याची पाहणी करण्यासाठी हे लोक आले होते. यावेळी अनेकांनी रुग्णालयातच हंबरडा फोडला. आपल्या नातेवाईकांना शोधण्यासाठी त्यांची धावपळ सुरू होती.