मुंबई : सोशल मीडियावर महिलांना अश्लील मेसेज करणाऱ्या प्रकरणात हल्ली मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुंबईत सध्या याच प्रकारामुळं एका टीव्ही अँकरलाही मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागलं. या प्रकरणी मुंबईतील कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी अश्लील मेसेज करणाऱ्या विकृताला पश्चिम बंगालमधून अटक केली.
मागील अनेक दिवसांपासून आरोपी संबंधित टीव्ही अँकरला फेसबूकवर अश्लील मेसेज करत होता. सुरुवातील तक्रारदार अँकरने या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. मात्र, आरोपीने त्रास देण्याचे प्रमाण वाढल्यानंतर संबंधित तरुणीने त्याला फेसबकुवर आरोपीला ब्लॉकही केले. तरिही हा प्रकार थांबला नाही. आरोपीने फेसबुकवर वेगवेगळ्या नावाने आपली अनेक खाती बनवली होती. त्यामुळे एक खाते ब्लॉक केले की तो दुसऱ्या खात्यावरुन अश्लील मेसेज पाठवत, अशी माहिती कफ परेड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रश्मी जाधव यांनी दिली.
जाधव यांनी सांगितले, “रवींद्र कुमार असे आरोपीचे नाव असून त्याने तक्रारदार तरुणीला टीव्हीवर पाहिले होते. त्याने फेसबुकवर अँकरचे नाव शोधून अश्लील मेसेज करण्यास सुरुवात केली. मात्र, तरुणीने त्याला फेसबुकवर ब्लॉक केल्यानंतरही त्याने वेगवेगळ्या 3 फेसबूक खात्यांचा उपयोग करुन त्रास देणे सुरुच ठेवले.”
तक्रारदार अँकरचे लग्न झाले असून तिच्या पतीनेही आरोपीला जाब विचारला. मात्र, आरोपीने त्याला आणि अँकरच्या सासूला देखील असेच अश्लील मेसेज केले. शेवटी कंटाळून तक्रारदार अँकरने कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तक्रारीनंतर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीच्या पश्चिम बंगालमध्ये जाऊन मुसक्या आवळल्या. सध्या आरोपीची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.