विरार : विरारमध्ये अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. विरारमध्ये अवाढव्य हायवा ट्रक गटारात कोसळल्याने मोठी दुर्घटना झाली आहे. या दुर्घटनेत एक जण जागीच ठार झाला आहे. तर पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. या ट्रक खाली अजून सहाजण अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. क्रेनद्वारे हा ट्रक बाजूला करून अडकलेल्या सहा जणांची सुखरूप सुटका करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही घटना घडल्यानंतर परिसरात मोठी गर्दी झाली आहे.
आज सकाळी साडे दहाच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. विरारच्या ग्लोबल सिटी परिसरात हायवा ट्रक गटारात पलटी झाला. विरुद्ध दिशेला जाणाऱ्या दोन मोटारसायकल ट्रक खाली दबल्याने एकाचा मृत्यू तर दोनजन पती पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. ट्रकखाली अजून सहाजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात पाठवले आहे. तर ट्रकखाली अडकलेल्या सहाजणांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. क्रेन आणि जेसीबीच्या सहाय्याने ट्रक बाजूला केला जात आहे. अर्नाळा पोलीस, वसई-विरार अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होऊन हे रेस्क्यू ऑपरेशन करत आहेत.
हा ट्रक नारंगी फाटकाकडे जात होता. रस्ता अरुंद होता. बाजूलाच भला मोठा गटार होता. या निसरड्या रस्त्यावरून जात असतानाच हा अपघात झाला. समोरून येणाऱ्या पिकअप जीपला साईड देत असताना हायवा ट्रक गटारात कोसळला. त्याचबरोबर विरुद्ध दिशेला जाणाऱ्या दोन जीप ट्रक खाली दबल्या गेल्या. त्यावरून पती-पत्नी जात असल्याचं सांगितलं गेलं. जीपवरील तरुण ट्रकखाली आल्याने ते जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचं नाव सुजाता सुधीर शेलार असं आहे. त्या 35 वर्षाच्या आहेत. तर अशोक शुक्ला आणि रमा शुक्ला हे पती-पत्नी जखमी झाले आहेत. त्यांना विरारच्या संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगितलं जात आहे.