उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले तर सोनिया गांधी आणि शरद पवारांनी त्यांच्या हाताखाली काम करावं: प्रविण दरेकर

| Updated on: May 29, 2021 | 4:03 PM

तर सोनिया गांधी आणि शरद पवार यांनी उपपंतप्रधान म्हणून त्यांच्या हाताखाली काम करावं | Pravin Darekar Uddhav Thackeray PM

उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले तर सोनिया गांधी आणि शरद पवारांनी त्यांच्या हाताखाली काम करावं: प्रविण दरेकर
प्रवीण दरेकर आणि उद्धव ठाकरे
Follow us on

बुलढाणा: उद्धव ठाकरे यांच्या रुपाने मराठी माणूस पंतप्रधान झाला तर अभिमानच वाटेल. मात्र, त्यासाठी संख्याबळ असावं लागतं, असा उपरोधिक टोला भाजप नेते प्रविण दरेकर यांनी शिवसेनेला लगावला. तसेच उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) पंतप्रधान झाले तर सोनिया गांधी आणि शरद पवार यांनी उपपंतप्रधान म्हणून त्यांच्या हाताखाली काम करावं, अशी खोचक टिप्पणीही प्रविण दरेकर यांनी केली. (BJP leader Pravin Darekar take a dig at Shivsena)

ते शनिवारी बुलढाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेचे जनसंपर्क प्रमुख व माध्यम सल्लागार हर्षल प्रधान यांनी लिहलेल्या एका लेखासंदर्भात भाष्य केले. या लेखात हर्षल पाटील यांनी उद्धव ठाकरे हे देशाचे पंतप्रधान व्हावे, अशी सर्वसामान्यांची इच्छा असल्याचे म्हटले होते. त्यावर प्रविण दरेकर यांनी खोचक भाष्य शिवसेनेला लक्ष्य केले.

काय म्हणाले होते हर्षल प्रधान?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देशातील संवेदनशील आणि विनम्र नेत्यांपैकी एक आहेत. कदाचित ते देशातील एकमेव मुख्यमंत्री आहेत जे सातत्याने आपल्या जनतेसोबत संवाद साधतात, तसंच सर्व तथ्य आणि उणीवा त्यांच्यासमोर मांडून आपलं सरकार कशापद्धतीने करोना महामारीशी लढत आहे हे समजावून सांगतात.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळून अद्याप दोन वर्षही पूर्ण केलेली नाहीत. मात्र जे उद्धव ठाकरेंना ओळखतात त्यांना थोड्याच कालावधीत त्यांनी मिळवलेलं हे यश पाहून आश्चर्य वाटत नाही. आपले वडील बाळासाहेब ठाकरे यांचे राईट हँड म्हणून काम करत असताना त्यांनी या कौशल्यांना खतपाणी घातलं. फार कमी लोकांना माहिती आहे की, बाळासाहेब ठाकरे हयात असतानाही उद्धव ठाकरेंनी अनेक निर्णय घेतले. बाळासाहेबांनी नेहमीच आपल्या मुलाच्या निर्णयांना पूर्ण पाठिंबा दिला होता.

सुरुवातीला जेव्हा उद्धव ठाकरे यांनी अधिकृतपणे पक्षातील कामकाजात सहभाग घेण्यास सुरुवात केली तेव्हा त्यावेळच्या नेत्यांनी ते वडिलांप्रमाणे वागत नसून किंवा त्यांच्या स्टाइलचं अनुसरण करत नसल्याची टीका केली होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी नेहमीच सांगितलं की, “माझ्या वडिलांनी मला कोणाचंही अनुकरण करु नको, अगदी माझंही असं शिकवलं आहे. मी माझ्या पद्धतीने सामान्यांसाठी चांगली कामं करावीत इतकीच त्यांची अपेक्षा आहे. मी माझ्या वडिलांच्या विचारांचं अनुसरण करतो, स्टाइलचं नाही”.

‘उद्धव ठाकरे बाळासाहेबांची कॉपी नसतील पण त्यांना लोकांची मनं जिंकता येतात’

जेव्हा उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख झाले तेव्हा त्यांनी वेगळ्या पद्धतीने काम केलं. त्यांनी त्यांचं लक्ष्य ठरवलं आणि ते साध्यदेखील केलं. पक्षांतर्गत वादासारख्या अनेक लढाया त्यांनी एकट्याने लढल्या. अनेक वरिष्ठ नेत्यांनी उद्धव ठाकरेंची तुलना राज ठाकरेंसोबत केली. राज ठाकरे बाळासाहेबांसारखे दिसतात आणि काम करतात असा दावाही केला. राज ठाकरे जनतेचे नेते असून उद्धव नाहीत असंही म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी मात्र त्या सर्वांना चुकीचं ठरवलं आहे. उद्धव ठाकरेंनी सिद्ध केलं आहे की, कदाचित ते त्यांच्या म्हणण्यानुसार बाळासाहेबांची कॉपी किंवा जनतेचे नेते नाहीत, परंतु मनं कशी जिंकावीत हे निश्चितपणे माहित आहे, असे हर्षल प्रधान यांनी आपल्या लेखात म्हटले होते.

(BJP leader Pravin Darekar take a dig at Shivsena)