गणेश थोरात, प्रतिनिधी, मुंबई | 23 डिसेंबर 2023 : उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा केंद्र सरकारवर तोफ डागली. ‘EVM है तो मुमकिन है’ चिमटा त्यांनी केंद्र सरकारला काढला. भाजप याच आधारे निवडणूक जिंकत असल्याची अप्रत्यक्ष टोला त्यांनी हाणला. ईव्हीएमवरुन अनेकदा विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले आहे. नुकत्याच पाच राज्याचे निकाल आले. त्यात भाजपने राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये करिष्मा केला. त्यानंतर ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. संजय राऊत यांनी नेमका हाच धागा पकडून केंद्र सरकारवर थेट निशाणा साधला. संसद घुसखोरीप्रकरणात केंद्र सरकारच्या भूमिकेचा पण त्यांनी चांगलाच समाचार घेतला.
केंद्रीय गृहमंत्री संसदे बाहेर उत्तर देतात
13 डिसेंबर 2023 रोजी संसदेत देशातील विविध भागामधील तरुणांनी घुसखोरी करुन घोषणाबाजी केली. संसदेची सुरक्षा व्यवस्था भेदल्या गेली. त्यावर विरोधकांनी केंद्र सरकारला धारेवर धरले. इतिहासात पहिल्यांदाच इतक्या खासदारांचं निलंबन झाले. केंद्र सरकारच्या भूमिकेवर खासदार संजय राऊत यांनी टीका केली. प्रल्हाद जोशी हे संसदीय कामकाज मंत्री आहेत. भाजप सत्तेत नसताना ते विरोधी पक्षात होते, विरोधकांच काम आहे सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारायचं, जर प्रश्नांचं उत्तर मिळत नाही तर आम्ही उभ राहून प्रश्न विचारणार, तो संविधानाने दिलेला आम्हाला हक्क आहे, असे ते म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत येऊन संसदेत घुसखोरी कशी झाली याचं उत्तर द्यायला हवं तर ते त्याची उत्तर बाहेर देत, असल्यावर त्यांनी टीका केली.
निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या
ईव्हीएम आहे तर सर्व मुमकिन आहे. त्यांना ईव्हीएम मशीनवर मोठा विश्वास आहे, असा चिमटा खासदार राऊत यांनी काढला. आमचं म्हणणं आहे बॅलेट पेपरवर निवडणुका लढवा. तुम्ही ते ऐकत नाही, कारण तुम्ही हरणार. इतर देशात बॅलेट पेपरवर निवडणूक होतात. तुम्ही स्वतःला महाशक्ती मानत आहात. या ठिकाणी तुम्ही निवडणुका बँलेट पेपर वर का घेत नाही, असा सवाल त्यांनी केंद्र सरकारला विचारला.
विरोधकांवरच कारावाया
सुनील केदार हे काँग्रेसचे मोठे नेते आहेत .लढवय्ये नेते आहेत. भाजपचे असे अनेक नेते आहेत .त्यांच्यावरती असे अनेक खटले चालले पाहिजेत, कारवाया झाल्या पाहिजे, पण न्यायालयावर दबाव असल्याने विरोधी पक्षाच्या नेत्यांवरच कारवाया होत आहेत. त्यांच्याच आमदारकी रद्द होत आहे. असे ते म्हणाले. नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील -चिखलीकर यांच्या अशोक चव्हाण यांच्यावरील विधानावर ते व्यक्त झाले. चिखलकारांनी अनेक प्रक्ष बदलले आहेत त्याबद्दल मी काय बोलणार नाही, असे ते म्हणाले.