मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामागे ते एकटे नसून शिवसेनेचाच हात असल्याचा आरोप एमआयएमचे औरंगाबादते खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी केला आहे. ज्या पद्धतीने हे सर्व होत आहे, त्यावरून एकनाथ शिंदे एकटे नाहीत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आमदार गुजरातला जातात आणि सरकारला हे लक्षातही येत नाही, असे होऊ शकत नाही. सर्व आमदारांना पोलिसांचे संरक्षण होते. त्या पोलिसांचे काम काय आहे? नियमाप्रमाणे पोलिसांना आपले कार्यक्षेत्र सोडताना हेडक्वार्टरला कळवावे लागते, की आमचे आमदार याठिकाणी चालले आहे, जावे की नाही, अशी परवानगी घ्यावी लागते. मात्र इथे असे काहीच दिसत नाही. त्यामुळे संशयाची सुई शिवसेनेकडे (Shivsena) जात असल्याचा रोख इम्तियाज जलील यांच्या बोलण्यातून दिसत होता.
30, 35, 40 आमदार मुंबईहून गुजरातला गेले आणि या सरकारमधील कोणालाच माहीत नाही, असा सवाल करत बळजबरीने नेल्याचा आरोप काही जणांनी केला. त्यावर ते म्हणाले, की बळजबरीने न्यायला काय पिशवीत भरून नेले होते का, असा प्रतिप्रश्न केला. सरकार आणि मुख्यमंत्री गाफील राहिले का, असे विचारले असता, त्यांनी या सर्व कटात शिवसेना सामील असल्याचा आरोप केला. असे सर्वत्र बोलले जात असल्याचे ते म्हणाले. तुम्हाला मंत्री केले आणि तुम्हीसुद्धा त्यांच्याबरोबर जाता, आणखी काय हवे, असेही प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
औरंगाबादेतील शिवसेनेच्या आमदारांवर टीका करताना ते म्हणाले, की अब्दुल सत्तारांचे आयुष्य काँग्रेसमध्ये गेले. ते काही शिवसैनिक नाहीत. त्यांचा हिंदुत्वाशी संबंध नाही. दुसरे एक आमदार… त्यांना तर केवळ पैसा हवा आहे. या लोकांचा पक्षनिष्ठा, हिंदुत्व याच्याशी काहीही संबंध नाही. त्यांना कोणती विचारधारा नाही. जे त्यांना पैसे देतील, त्यांच्यामागे ते पळतील आणि तसे झालेही आहे. आकडेवारीसह हे मी सिद्ध करेल, असा दावा इम्तियाज जलील यांनी यावेळी केला.