मुंबई : 19 ऑगस्ट 2023 | वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती केली. मात्र, महाविकास आघाडीसोबत प्रकाश आंबेडकर येणार का? याची चर्चा सुरु आहे. प्रकाश आंबेडकर यांनी मी महाविकास आघाडीसोबत आलो तर ते कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांना चालणार आहे का? असा थेट सवाल केला होता. तर, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकर यांना कॉंग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिल्याच्या बातम्या येत आहेत. यावर खुद्द प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका मांडली आहे.
देशात विरोधी पक्षांनी INDIA ही नवी आघाडी स्थापन केली आहे. INDIA याला बळ मिळण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी INDIA सोबत यावे असे काँग्रेस नेत्यांना वाट आहे. त्यात अशोक चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससोबत यावं, अशी आपली वैयक्तिक इच्छा असल्याचे वक्तव्य केले होते.
अशोक चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेससोबत येण्याची ऑफर दिली. वंचित बहूजन आघाडीलासोबत घेण्यासंदर्भात काँग्रेसची चर्चा सुरू आहे. कॉंग्रेसच्या ऑफरबाबत प्रकाश आंबेडकर सकारात्मक आहेत अशा आशयाचे ट्विट शशी सिंग या व्यक्तीने केले होते.
त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून जाणीवपूर्वक लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे असे म्हटले आहे. तसेच, ‘ना कबुतर, ना फोन, कुछ भी नहीं आया.’ ही काँग्रेसची पेटंट मोडस ऑपरेंडी आहे. कोणताही पत्र व्यवहार न करता ते लोकांना असेच सांगत फिरतात. अशी टीका आंबेडकर यांनी केली.
वंचित बहुजन आघाडीनेही या बातमीची खिल्ली उडवली आहे. INDIA युती आणि महाविकास आघाडीसाठी आमचे दार उघडे आहे. आरएसएस – भाजपला हरवण्यासाठी वंचित, बहुजनांना सोबत घेतल्याशिवाय ही लढाई अशक्य आहे असे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीरपणे सांगितले आहे. पण, वंचित बहुजन आघाडीची INDIA आणि महाविकास आघाडीतील इन्ट्री कोण रोखतंय? असा सवालही वंचित बहुजन आघाडीने केला आहे.