मुंबई : नवीमुंबईच्या ऐरोली येथून लोकल पकडणाऱ्या एका 19 वर्षीय कॉलेज तरूणीला लोकलमध्ये ह्दयविकाराचा सौम्य झटका आला. ही कॉलेज तरूणी लोकलच्या गर्दीत चक्कर येऊन पडली. त्याचवेळी ड्यूटीवर असलेल्या मध्य रेल्वेच्या दोन महिला टीसींनी प्रसंगावधान दाखवित मदत केल्याने वेळीच उपचार मिळून या तरूणीचे प्राण बचावल्याची घटना काल घडली.
महिला टीसी दीपा वैद्य आणि जैन मार्सेला या दोघींनी तातडीने ठाणे स्थानकात फोन करून फलाट क्रमांक एकवर वैद्यकीय पथक तयार ठेवले. ठाणे स्थानकात तातडीने व्हीलचेअर बोलावून या तरूणीला प्राथमिक उपचार देण्यात आले. परंतू या तरूणीचे प्रकृती बिघडल्याने जीआरपी पोलीस आणि प्रवाशांच्या मदतीने या तरूणीला ठाण्यातील रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या तरूणीला ह्दयविकाराचा आजार असल्याने तिला त्यानंतर सिव्हील रुग्णालयात आसीयूमध्ये दाखल केले गेले. या तरूणीला ह्दयविकाराचा सौम्य झटका आल्याचे स्पष्ट झाल्याने तिच्यावर वेळीच शस्रक्रीया झाल्याने या तरूणीचे प्राण बचावले.
महिला टीसी दीपा वैद्य आणि जैन मार्सेला या दोघींनी दाखविलेल्या प्रसंगावधानाने या तरुणीचे प्राण बचावल्याने या दोघींच्या कर्तव्यतत्परतेचे कौतूक केले जात आहे.