दिंडोशी आणि राष्ट्रीय उद्यान मेट्रो स्थानकातील पादचारी पुलांचे लोकार्पण, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे ओलांडण्यासाठी होणार मदत

| Updated on: May 12, 2023 | 6:23 PM

सध्या एमएमआरडीए मेट्रो मार्ग 7 च्या सात स्थानकांनजिक पादचारी पुलाची उभारणी करीत आहे. या पादचारी पुलांमुळे रस्त्यावरील वाहनांच्या ट्रॅफीकमधून नागरिकांची सुटका होऊन अपघातही कमी होतील.

दिंडोशी आणि राष्ट्रीय उद्यान मेट्रो स्थानकातील पादचारी पुलांचे लोकार्पण, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे ओलांडण्यासाठी होणार मदत
metro fob
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : मेट्रो मार्ग 2 अ आणि मेट्रो मार्ग 7 चा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर लाखो प्रवाशांचा फायदा होत आहे. आता मेट्रो प्रशासनाने मेट्रो 7 वरील दिंडोशी आणि राष्ट्रीय उद्यान मेट्रो स्थानकाच्या शेजारील दोन पादचारी पुलांचे शुक्रवारी एमएमआरडीए प्रशासनाने लोकार्पण केले. त्यामुळे हे पादचारी पुल मेट्रो प्रवासी, पादचारी आणि स्थानिक नागरिकांना पश्चिम द्रुतगती महामार्ग सुरक्षितपणे ओलांडण्यास मदत करणार आहेत. एकूण सात स्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसाठी पादचारी पुल उभारण्याची योजना आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 जानेवारी रोजी मेट्रो 2 अ मार्गिकेच्या वळनई – अंधेरी पश्चिम आणि मेट्रो 7 च्या गोरेगाव पूर्व – गुंदवली अशा दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण झाले. मेट्रो मार्ग 2 अ आणि 7 या दोन्ही मेट्रो मार्गिका सुरू झाल्या आहेत. या मार्गिका मेट्रो 1 स्थानकाशी कनेक्ट आहेत. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशात पहिले मेट्रो नेटवर्क तयार झाले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त एस. व्ही.आर. श्रीनिवास यांनी दिंडोशी स्थानकातील पादचारी पुलाचे तर राष्ट्रीय उद्यान मेट्रोस्थानकातील पादचारी पुलाचे अतिरिक्त महानगर आयुक्त गोंविद राज आणि सह महानगर आयुक्त एस.राममूर्ती यांच्या उपस्थित उद्घाटन झाले.

या भागातील लोकांना फायदा

दिंडोशी मेट्रो स्थानकातील पादचारी पुल 112 मीटर लांब आणि 4 मीटर रुंद आहे. तर राष्ट्रीय उद्यान मेट्रो स्थानकाचा पादचारी पूल 83 मीटर लांब आणि 4 मीटर रुंद आहे. या दोन्ही स्थानकांच्या उत्तर दिशेला पूर्व-पश्चिम असे हे पुल जोडले गेले आहेत. राष्ट्रीय उद्यान ( नॅशनल पार्क) लगतच्या पादचारी पुलामुळे नॅशनल पार्कचा परिसर, अशोक व्हॅन, काजूपाडा, एन.जी.पार्क कॉम्प्लेक्स, बोरिवली पूर्व आणि कुलुपवाडी येथील रहिवाशांना फायदा होणार आहे. तसेच दिंडोशी येथील पादचारी पूलामुळे कोकणीपाडा, मालाड पूर्व, गोकुळधाम, फिल्मसिटी आणि पठाणवाडी या भागातील पादचारी आणि नागरिकांना फायदा होणार आहे.

सात पादचारी पुलांचे काम सुरू

सध्या एमएमआरडीए मेट्रो मार्ग 7 च्या गुंदवली, गोरेगाव, आरे, दिंडोशी, पोयसर, राष्ट्रीय उद्यान, ओव्हरपाडा या स्थानकांवर एकूण 7 पादचारी पूल बांधत आहे. यापैकी गुंदवली स्थानकावरील पादचारी पूल या आधीच सुरू करण्यात आला आहे, हा पुल मेट्रो मार्ग 7 ला मेट्रो मार्ग 1 सोबत जोडतो.

अपघाताचे प्रमाण घटणार

पादचारी पूल हे केवळ मेट्रो प्रवाशांसाठीच नव्हे तर इतर पादचाऱ्यांनाही सुरक्षित रस्ता ओलांडण्यासाठी फायदेशीर ठरतील. अनेक खाजगी  आणि व्यावसायिक कार्यालये देखील या पादचारी पुलाच्या सहायाने मेट्रो स्थानकांना जोडली जात आहेत. या प्रकारच्या थेट जोडणीमुळे, लोक रस्ते न ओलांडता थेट मेट्रो स्थानकांवरून मॉल आणि कार्यालयात जाऊ शकतात. यामुळे रस्त्यावरील वाहनांच्या ट्रॅफीकमधून सुटका होऊन अपघातही कमी होतील असे प्राधिकरणाचे महानगर आयुक्त एस. व्ही.आर. श्रीनिवास यांनी म्हटले आहे.