मुंबई : वाढत्या औद्योगिकीकरण आणि वसाहतीकरणामुळे जगभरात अनेक प्राण्यांच्या जमाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे काही ठिकाणी त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्नही सुरु आहेत. मात्र, अजूनही म्हणावा तसा परिणाम साधता आलेला नाही. मात्र, महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धनाला चांगले यश मिळताना दिसत आहे. 2014 च्या तुलनेत 2019 मधील वाघांच्या संख्येत 122 वाघांची वाढ झाली आहे.
व्याघ्र मोजणीनुसार महाराष्ट्रात 2014 मध्ये वाघांची संख्या 190 होती. आता 2019 मध्ये ती वाढून 321 इतकी झाली आहे. वाघांच्या संख्येतील ही वाढ अंदाजे 65 टक्के आहे. स्थानिकांच्या सहभागातून वन विभागाने व्याघ्र संवर्धनासाठी प्रयत्न केले, त्याचेच हे यश असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील व्याघ्रसंवर्धनाला भरीव यश
भारतीय वन्यजीव संस्था, डेहरादून आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने देशात दर 4 वर्षांनी व्याघ्रगणना करण्यात येते. देशात पहिली व्याघ्र गणना 2006 रोजी झाली. त्यानुसार महाराष्ट्रात 2006 मध्ये 103 वाघ होते. 2010 मध्ये ते वाढून 168 झाले. 2014 मध्ये झालेल्या व्याघ्रगणनेत ही संख्या वाढून 190 झाली. मागील 4 वर्षात राज्यातील वाघांच्या संख्येत अंदाजे 65 टक्के वाढ होऊन आता ही संख्या 312 इतकी झाली आहे. वाघांच्या संख्येत महाराष्ट्र देशात पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर आला आहे.
देशातील जंगलांमध्येही 741 वाघांची वाढ
व्याघ्रगणनेनुसार 2006 मध्ये देशात 1411 वाघ होते. 2010 मध्ये दुसरी गणना झाली तेव्हा 1706, 2014 मध्ये तिसरी गणना झाली तेव्हा देशात 2226 वाघ होते. वाघांच्या या संख्येत वाढ होऊन आता देशात 2967 वाघ झाले आहेत.
राज्यात 6 व्याघ्र प्रकल्प
राज्यात बोर, मेळघाट, पेंच, नवेगाव नागझिरा आणि सह्याद्री, ताडोबा-अंधारी असे 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. या 6 व्याघ्रप्रकल्पाच्या क्षेत्रात स्थानिकांच्या सहभागातून वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याला वन विभागाने प्राधान्य दिले आहे. व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावांमधील स्थानिकांचे वनावरचे अवलंबित्व कमी व्हावे, मानव वन्यजीव संघर्ष कमी व्हावा या उद्देशाने “डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना” राबविली जात असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे. या योजनेमध्ये समाविष्ट गावांमध्ये स्थानिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देताना पर्यायी रोजगार संधी विकसित करून दिल्या जात आहेत, असेही वन विभागाकडून सांगण्यात येत आहे.
देशात वाघांच्या संख्येत मध्यप्रदेशचा अव्वल क्रमांक आहे. येथील वाघांची संख्या 2014 च्या व्याघ्रगणनेत 308 होती, ती आता 2019 मध्ये 526 इतकी झाली आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक असून तेथील वाघांची संख्या 406 वरुन 524 इतकी झाली आहे. व्याघ्रसंवर्धनात तिसरा क्रमांक उत्तराखंड राज्याने पटकावला आहे. येथील वाघांची संख्या 340 वरुन 442 इतकी झाली आहे. महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर असून राज्यातील वाघांची संख्या 190 वरुन 312 इतकी झाली. पाचव्या स्थानावर तामिळनाडू राज्य असून येथील वाघांची संख्या 229 वरुन 264 झाली आहे.