मुंबई: भाजपने राज्यसभेसाठी (rajya sabha) तिसरा उमेदवार दिला आहे. त्यामुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार विरुद्ध भाजपचे (bjp) धनंजय महाडिक (dhananjay mahadik) असा सामना रंगताना दिसणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आपल्याकडे 42 मतांचा कोटा असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. तर आम्हाला फक्त दहा मतांची गरज असून या मतांची गोळाबेरीज झाली असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे. स्वत: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उमेदवार धनंजय महाडिक यांनीही याबाबतचा खुलासा केला आहे. आमच्याकडे मते असल्याशिवाय उमेदवार देऊ का? असं सांगून देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचं टेन्शन वाढवलं आहे. त्यामुळेच राऊत यांना कधी नव्हे ते आज तीनदा मीडियासमोर येऊन शिवसेनेकडे मतांची बेगमी पुरेशी असल्याचं सांगावं लागलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
धनंजय महाडिक हे माजी खासदार आहेत. आता ते राज्यसभेत जाण्यास उत्सुक आहेत. आज त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मतांचं गणित सांगितलं. आमच्या तिन्ही जागा निवडून येतील. आम्ही अर्ज दाखल केला आहे. आमच्याकडे 31 मते आहेत. इतर 11 मतांचं गणित जुळवण्यात आलं आहे. काही अपक्ष आमदारांशी मी स्वत: बोलत आहे. पक्षश्रेष्ठींचीही बोलणी झाली आहे. त्यामुळे आमचा विजय होणार हे निश्चित आहे, असं धनंजय महाडिक म्हणाले.
भाजपकडे 31 मते आहेत. त्या्ंना अजून 11 मतांची गरज आहे. निवडून येण्यासाठी 42 मतांची गरज आहे. पण शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्याने हा कोटा 41वर येईल. त्यामुळे भाजपला केवळ दहा मतांची गरज पडेल. तर आपल्याकडे 42 मते असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. अपक्षांची मते गृहित धरून शिवसेनेने हा दावा केला आहे. त्यातच महाडिक यांनी अपक्ष आमदारांशी बोलणी सुरू असल्याचं सांगितलं आहे. पक्षश्रेष्ठींनीही अपक्षांशी संवाद साधल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे या निवडणुकीत घोडेबाजार होण्याची दाट शक्यता असून 11 अपक्ष आमदार कुणाच्या गळाला लागतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, हे आमदार भाजपच्या गळाला लागल्यास शिवसेनेसाठी तो मोठा फटका असू शकतो. त्यामुळे राज्य सरकारही अस्थिर होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळेच या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.