Howrah Mumbai Express Bomb Threating Call : मुंबई हावडा एक्सप्रेसला नाशिकच्या आधी बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी रेल्वे विभागाला मिळाली आहे. ट्वीटरवरुन ही धमकी देण्यात आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या धमकीनंतर रेल्वे सुरक्षा बल व बॉम्बशोधक पथकाकडून मुंबई हावडा एक्सप्रेसची तपासणी करण्यात आली. मात्र रेल्वेमध्ये काहीही न सापडल्याने ही ट्रेन पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली आहे.
रेल्वे सुरक्षा बलाने दिलेल्या माहितीनुसार, हावडा रेल्वे स्थानकावरुन मुंबईकडे येणाऱ्या 12809 या हावडा-मुंबई मेलमध्ये टायमर बॉम्ब ठेवला आहे. नाशिक स्थानक येण्याच्या आधी या गाडीत मोठा बॉम्बस्फोट होईल, असा मेसेज रेल्वे विभागाला ट्विटरवरुन मिळाला होता. यानंतर रेल्वे प्रशासनात खळबळ उडाली होती. मुंबई हावडा मेलमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळताच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते.
Fazluddin Nirban या नावाच्या ट्विटर अकाउंटवरून रेल्वे प्रशासनाला धमकीचा मेसेज मिळाला आहे. हिंदुस्तानी लोकांनी आजची सकाळ तुमच्यासाठी रक्तरंजित असणार आहे. आज एका फ्लाईटमध्ये आणि एका ट्रेनमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला आहे. नाशिक येण्यापूर्वी खूप मोठा बॉम्बस्फोट होईल, असे एका व्यक्तीने ट्वीट केले आहे.
ट्विटरवरून आलेल्या धमकीच्या मेसेजनंतर जळगाव रेल्वे सुरक्षा बल आणि बॉम्बशोधक पथकाकडून जळगाव रेल्वे स्थानकावर मुंबई हावडा रेल्वे गाडी थांबवण्यात आली. हावडा-मुंबई मेलमध्ये 12809 ट्रेनमध्ये टायमर बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन, पोलीस आणि अग्निशमन दलाने तातडीने जळगाव रेल्वे स्थानकावर धाव घेतली. यानंतर या गाडीची पूर्णपणे तपासणी करण्यात आली. पहाटे 4:17 मिनिटांनी जळगाव रेल्वे स्थानकावर ही गाडी थांबवली. रेल्वे सुरक्षा बल आणि बॉम्बशोधक पथकाकडून गाडीतील प्रत्येक डब्ब्यात जाऊन ही तपासणी करण्यात आली.
तब्बल 2 तास 17 मिनिटे या गाडीची संपूर्ण तपासणी करण्यात आली. या तपासणीनंतर 6 वाजून 28 मिनिटांनी ही एक्सप्रेस पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ करण्यात आली. या माहितीला रेल्वे सुरक्षा बलाने विभागाकडून दुजोरा देण्यात आला आहे.
तर दुसरीकडे मुंबईहून न्यूयॉर्कला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हे विमान दिल्लीकडे वळवण्यात आले असून दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर या विमानाचे इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आले. सध्या हे विमान विमानतळावर उभे असून विमानातील प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रोटोकॉलप्रमाणे तपास केला जात आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.