मुंबई : रेल्वे स्टेशनपासून (Railway Station) दूर राहणारे अनेक प्रवाशी दुचाकी किंवा चार चाकी वाहने रेल्वेच्या हद्दीत पार्क करतात. वाहने पार्क करण्यासाठी रेल्वे स्टेशन, आजूबाजूचा परिसर, रेल्वेचे पार्किंग क्षेत्र, तसेच नो पार्किंग क्षेत्राचाही वापर केला जातो. पण कित्येकदा रेल्वेच्या परिसरात पार्क केल्या जाणाऱ्या गाड्या अशाच धूळ खात पडलेल्या असतात. येत्या 15 ऑगस्टच्या दिवशी याचा गैरवापर होऊ शकतो, हे लक्षात घेऊन रेल्वेने ‘ऑपरेशन नंबर प्लेट’ (Operation Number Plate) सुरु केले आहे.
येत्या 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने सुरक्षेच्या कारणास्तव ‘ऑपरेशन नंबर प्लेट’ सुरु केले आहे. रेल्वेच्या आजूबाजूच्या परिसरातील बेवारस वाहनांच्या विरोधात हे महत्त्वपूर्ण अभियान मानलं जातं.
ऑपरेशन नंबर प्लेट हे अभियान 9 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट दरम्यान राज्यातील 466 रेल्वे स्टेशनवर राबवलं गेलं. या दरम्यान चोरी केलेली 4 वाहने जप्त करण्यात आली आहे. तसेच रेल्वे स्टेशन परिसराच्या हद्दीत 5 दिवसांपेक्षा जास्त दिवस उभी असलेली 3 हजार 943 वाहने बेवारस असल्याचे यात आढळून आलं. त्याशिवाय 894 वाहनांची पडताळणी प्रक्रिया सुरु असून ती झाल्यानंतर त्यावर योग्य ती कारवाई केली जाणार आहे.
त्याशिवाय 2034 वाहने एक दिवसापेक्षा जास्त वेळ नो पार्किंग क्षेत्रातील पार्क केलेली असल्याचे यादरम्यान आढळले. तसेच 28 वाहनांची चौकशी सुरु आहे.
या कारवाईदरम्यान जवळपास 549 वाहनांना टो करण्यात आले आहे. ही टो करण्यात आलेली वाहने पुढील कारवाईसाठी पोलिसांकडे सोपवण्यात आली आहेत. विशेष म्हणजे रेल्वे स्टेशनच्या हद्दीत अनधिकृत पार्किंग करणाऱ्या वाहनांकडून तब्बल 59 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
इतकंच नव्हे तर मुंबईत मध्य रेल्वे प्रशासनानेही हे अभियान रेल्वे स्टेशनच्या हद्दीत राबवले. त्यात एक दिवसांपेक्षा जास्त वेळ पार्क करणाऱ्या वाहनांमध्ये 114 वाहनांचा समावेश आहे. तर 40 वाहने नो पार्किंग क्षेत्रात जवळपास पाच दिवस पार्क केली होती.
मध्य रेल्वेच्या सीएसएमटी, भायखाळा, कुर्ला टर्मिनस, कुर्ला स्टेशन, ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ या महत्त्वाच्या स्टेशनवर हे अभियान सुरु करण्यात आले. या अभियानतंर्गत मध्य रेल्वेने 26 हजार 140 रुपये दंड स्वरुपात वसूल कले आहे. तर पनवेल, रोहा, भायखाळा आणि डोंबिवली या स्टेशन परिसरातून 16 वाहनांना टो करण्यात आले आहे.