मुंबई | 12 ऑगस्ट 2023 : महाराष्ट्रातील औद्योगिक प्रकल्प विदेशात जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय. कोट्यवधी रुपयांचा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेलाय. या मुद्द्यावरुन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर निशाणा साधला होता. याशिवाय अनेक प्रकल्पांवरुन त्यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. तर सत्ताधाऱ्यांनी संबंधित प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळातच हे प्रकल्प परराज्यात गेल्याचा आरोप केला होता. याविषयी दोन्ही बाजूने वेगवेगळे दावे केले जात होते. हा सगळा वाद एकीकडे सुरु असताना आता राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एक चांगली खुशखबर दिली आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत हे नुकतंच चार दिवसांच्या साऊथ कोरिया देशाच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यातून त्यांनी भलीमोठी गुंतवणूक महाराष्ट्रात आणली आहे. उदय सामंत यांनी स्वत: याबाबतची गुड न्यूज दिली आहे. महाराष्ट्रात आता साऊथ कोरिया येथून हजारो कोटींची गुंतवणूक येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांना रोजगाराची देखील संधी उपलब्ध होणार आहे. सामंत यांनी साऊत कोरियातून दाखल होताच याबाबत माहिती दिली आहे.
“मी चार दिवसाच्या साऊथ कोरिया दौऱ्याहून पुन्हा मुंबईमध्ये दाखल झालेलो आहे. जवळपास 9000 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार आहे. 5000 कोटींची हुंडाईची गुंतवणूक आहे. ही गुंतवणूक दोन टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात होणार आहे”, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. “मला एक सांगण्यात आनंद होत आहे की, महाराष्ट्र प्रगतीशील आहे आणि हा दौरा यशस्वी झालाय”, अशी गुडन्यूज उदय सामंत यांनी दिली.
उद्योगमंत्र्यांनी याबाबतची गोडन्यूज दिल्याने आता महाराष्ट्रातील तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्रात नेमकं कुठल्या जिल्ह्यात हा प्रकल्प येणार आहे? प्रकल्पाची नेमकी रुपरेषा काय? याबाबतची सविस्तर माहिती सध्या उदय सामंत यांनी दिलेली नाही. पण आगामी काळात ते याबाबत नक्कीच सविस्तर माहिती देण्याची शक्यता आहे. उदय सामंत यांनी केलेल्या या प्रयत्नांनंतर आता प्रत्यक्षपणे संबंधित प्रकल्प राज्यात कधी सुरु होणार? याकडे राज्याचं लक्ष असणार आहे.