मुंबई: आयएनएस विक्रांत (INS Vikrant) घोटाळ्याप्रकरणी भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचे चिरंजीव नील सोमय्या यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोमय्या यांना 14 जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यात आलं आहे. सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन येत्या 14 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. एका माजी सैनिकाच्या तक्रारीवरून सोमय्या आणि त्यांच्या चिरंजीवांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोमय्या यांनी सेव्ह विक्रांतच्या नावाखाली 57 कोटी रुपये हडपल्यांचा आरोप आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही हा आरोप लावून धरला होता. त्यामुळे सोमय्या अडचणीत आले होते. त्यानंतर ते काही दिवस नॉट रिचेबल होते. मात्र, कोर्टाने जामीन दिल्यानंतर सोमय्या पुन्हा माध्यमांसमोर आले होते. या दरम्यान मुंबई पोलिसांनी सोमय्या यांची दोनदा चार चार तास चौकशी केली होती. त्यानंतर आज पुन्हा हे प्रकरण कोर्टात आलं असता कोर्टाने त्यांना अटकेपासून संरक्षण देत मोठा दिलासा दिला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांची आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने चौकशी केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने सोमय्यांना 13 एप्रिल रोजी किरीट सोमय्या यांना अटकेपासून संरक्षण दिलं होतं. त्यानंतर 18 एप्रिलपासून सलग चार दिवस सकाळी 11 वाजता आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांची चौकशी करून चौकशी अहवाल सादर करण्यास पोलिसांना सांगण्यात आलं होतं.
सोमय्या यांचा हा घोटाळा बाहेर आल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आयएनएस विक्रांतची सेवा संपल्यानंतर ही युद्धनौका वास्तुसंग्रहालयात ठेवण्याची मागणी जोर धरत होती. त्यासाठी 200 कोटींचा खर्च येईल असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं होतं. त्यामुळे ही नौका भंगारात काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी सोमय्या यांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध करून सेव्ह विक्रांत ही मोहीम हाती घेतली. विमानतळ, रेल्वे स्थानक, बस स्थानक, चर्चगेट, नेव्ही आणि रहिवासी भागात सोमय्या यांनी विक्रांत वाचवण्यासाठी दान गोळा करण्यास सुरुवात केली होती. सोमय्या यांनी तब्बल 57 कोटी रुपये जमा केले होते, असा आरोप राऊत यांनी केला होता.
मात्र, सोमय्या यांच्या वकिलाने केवळ 11 हजार रुपयेच जमा झाल्याचं सांगितलं होतं. राजभवनाचं खातं नसल्याने सोमय्या यांनी ही रक्कम पक्षाला दिली होती, असं वकिलाने कोर्टात सांगितलं होतं. तर, राऊत यांनी हा पैसा सोमय्या यांनी मुलाच्या कंपनीत वापरल्याचा दावा केला होता. सोमय्या यांनी हा पैसा निवडणुकीतही वापरला होता, असा दावाही राऊत यांनी केल्याने खळबळ उडाली होती.