मुंबई : थकीत शेतकरी पीक विम्याबाबत (crop insurance) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन, पीक विमा कंपन्यांवर कारवाई करण्याची पुन्हा एकदा मागणी केली. पीक विमा कंपन्यांकडे शेतकऱ्यांचे 2 हजार कोटी रुपये आहेत. सरकारने हा पैसा शेतकऱ्यांना द्यावा आणि कंपन्यांवर कारवाई करावी, असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले, “शिवसेनेच्या सर्व खासदारांनी पंतप्रधानांना भेटून पीक विम्याची माहिती दिली. मागील वर्षी 1 कोटी 44 लाख अर्ज भरले. यापैकी 54 लाख पात्र ठरवले, तर 90 लाख शेतकरी अपात्र ठरवले गेले. त्यांचे 2 हजार कोटी रूपये विमा कंपन्यांकडे आहेत. ही योजना प्रधानमंत्री फसल योजना असून ती विमा कंपनी बचाव योजना नाही”.
पीक विम्यात मोठा घोटाळा आहे. यातील झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई व्हायला हवी. 90 लाख शेतकऱ्यांना अपात्र ठरवले कुणी? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
सरकारने पीक विमा कंपन्यांकडे असलेले 2000 हजार कोटी परत घेऊन ते शेतकऱ्यांना द्यावा, ही आमची मागणी आहे. या कंपन्यांना कडक शासन झाले पाहिजे, असं उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.
सरकार दुष्काळ जाहीर करते, मग हा दुष्काळ विमा कंपन्यांना का दिसत नाही? कंपन्यांनी पैसे देण्याचा वेग वाढवला नाहीतर पुन्हा आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही, असंही ते म्हणाले.
सरकार आमचेच आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा शेतकऱ्यांना मिळायला हवा. 10 लाख शेतकऱ्यांना 960 कोटी रूपये शिवसेनेमुळं मिळाले आहेत. शेतकऱ्यांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांची आता झाडाझडती घेण्याची वेळ आली आहे, असं उद्धव ठाकरेंनी ठणकावलं.
विमा कंपन्यांकडे 2188 कोटी थकीत?
दरम्यान पक्षाने केलेल्या सर्वेक्षणानुसार पीक विमा कंपन्याकडे 2188.92 कोटींची रक्कम थकवल्याची माहिती शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी दिली. त्यानुसार आयसीआयसीआय लोम्बर्ड 509.11कोटी, इफ्को टोकिओ 963.78 कोटी, भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड 83.22 कोटी, फ्युचर जनरल इंश्युरन्स कंपनी लिमिटेड 232.90 कोटी, बजाज अलायन्स 316.57 कोटी, भारती एक्सा इंश्युरन्स लिमिटेड 83.34 कोटी इतकी रक्कम थकीत असल्याचं त्यांनी सांगितलं.
स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा विटंबना
दरम्यान, उद्धव ठाकरेंना यावेळी दिल्ली विद्यापीठातील सावरकर पुतळा विटंबनेबाबतही विचारण्यात आलं. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “सावरकरांना जे मानत नाहीत, त्यांना भर चौकात फटके द्यायला हवेत”.