नाशिक पदवीधर निवडणुकीचा सस्पेन्स, भाजप सत्यजित तांबे यांच्यासोबत? शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Jan 18, 2023 | 7:40 PM

भाजप सत्यजित तांबे यांना पाठिंबा देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या विषयावर शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रतिक्रिया दिलीय.

नाशिक पदवीधर निवडणुकीचा सस्पेन्स, भाजप सत्यजित तांबे यांच्यासोबत? शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया
satyajeet tambe
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : नाशिक पदवीधर निवडणुकीच्या (Nashik Padvidhar Election) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलाय. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्या उमेदवारीवरुन विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. सत्यजित तांबे यांचे वडील आमदार सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना काँग्रेसची (Congress) उमेदवारी मिळाली तरी त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. याउलट त्यांनी आपल्या मुलाला पाठिंबा दिला. दुसरीकडे भाजपने नाशिकमधून एकही उमेदवार उभा केला नाही. त्यामुळे भाजप सत्यजित तांबे यांना पाठिंबा देणार का? अशा चर्चांना उधाण आलं. भाजपने अजूनही याबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. पण काँग्रेसकडून तांबे पिता-पुत्रांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. या दरम्यान भाजप सत्यजित तांबे यांना पाठिंबा देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या विषयावर शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रतिक्रिया दिलीय.

सत्यजित तांबे यांना भाजप-शिंदे युतीचा पाठिंबा मिळणार का? असा प्रश्न पत्रकारांनी आज दीपक केसरकर यांना विचारला. त्यावर केसरकर यांनी “हा तर भाजपने विचार केला पाहिजे. शेवटी आम्ही युती म्हणून एक आहोत”, अशी प्रतिक्रिया दिली. दीपक केसरकर यांनी स्पष्ट प्रतिक्रिया न दिल्यामुळे याबाबतचा सस्पेन्स कायम राहिला आहे.

हे सुद्धा वाचा

“काँग्रेस नेते नाना पटोले बोलतात विधान परिषदेच्या पाचच्या पाची जागा आम्ही जिंकू. स्वप्न बघणं कधीही वाईट नसतं. त्यामुळे त्यांनी स्वप्न अवश्य बघावी. पण युतीच्या पाचवी जागा आम्हीच निवडून येणार आहोत. दोन जागांवर तर आमचे विद्यमान उमेदवारच आहेत. मराठवाड्यामध्ये फाईट होणार आहे पण तिथे सुद्धा आम्हीच जिंकणार आहोत”, असं दीपक केसरकर म्हणाले.

महाविकास आघाडी शुभांगी पाटील यांना पाठिंबा देणार?

दुसरीकडे नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना शिवसेनेच्या ठाकरे गटाने पाठिंबा दिलाय. तसेच आपली महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून अधिकृत घोषणा व्हावी यासाठी शुभांगी पाटील यांचे प्रयत्न सुरु आहेत.

‘आमची बाजू सत्याची’

केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेनेचं नाव आणि चिन्हावर सुनावणी सुरु आहे. या सुनावणीवरही दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली.

“आमची बाजू सत्याची आहे. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांबरोबर राहिलो. मूळ पक्ष आमच्यासोबत आहे. सगळे आमदार-खासदार आमच्याबरोबर राहिले आहेत. आमची खात्री आहे आम्हाला न्याय मिळेल”, असं दीपक केसरकर म्हणाले.

“एक गोष्ट आहे की मराठी माणसाला स्वाभिमान आणि मुंबईकरांना स्वाभिमानाने उभारण्याची कोणी प्रेरणा दिली असेल तर ती बाळासाहेब ठाकरे यांनी दिली”, असंदेखील ते यावेळी म्हणाले.