मुंबईः बीबीसीच्या मुंबई कार्यालयामध्ये तब्बल 55 तासांनंतर आयकर विभागाचा तपास संपला आहे. तर आयकरच्या 6 कर्मचाऱ्यांनी मुंबईतील कलिना येथील बीबीसी कार्यालयातून ते बाहेर पडले असल्याचेही सांगण्यात आले आहे. या धाडीत आयकर विभागाने बीबीसी कार्यालयातून अनेक कागदपत्रे, पेन ड्राइव्ह आणि हार्ड ड्राइव्हही जप्त करण्यात आले आहेत.
आयकर विभागाचे एक पथक बॅलार्ड इस्टेट येथील सिंधिया हाऊस येथील मुख्यालयाकडे रवाना झाल्याचे सांगण्यात आले. तर त्याचवेळी दिल्लीतील कार्यालयातही तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून आयकरकडून बीबीसी दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांची तपासणी करण्यात आली होती. 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता अचानक आयटी विभागाची टीम तपासासाठी बीबीसी दिल्ली आणि मुंबई कार्यालयात पोहचली होती.
बीबीसीकडून गेल्या 10 वर्षातील आर्थिक व्यवहारांची माहिती मागवण्यात आली आहे. त्यामुळे बीबीसी कार्यालयातील काही संगणक आणि फोन जप्त करण्यात आले आहे.
ज्यामध्ये परदेशी निधी आणि हस्तांतरणाची चौकशी केली जात आहे. परदेशात केलेल्या काही आर्थिक व्यवहारासंबधाबाबत कागदपत्रांची छाननी केली जात आहे.
तर आयकर विभागाचे कर्मचारी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करत आहेत. तर बीबीसीच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मोबाईलमधून कोणताही डेटा हटवू नका अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
आयकर विभागाच्या तपासकार्यामुळे तेथील कर्मचारी चक्रावले असल्याचेही म्हटले आहे. तर यादरम्यान आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बीबीसीच्या काही कर्मचाऱ्यांचे फोन जप्त केले होते.
बीबीसी कार्यालयावर आयकर धाड टाकल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी मोदी सरकारला घेराव घालण्यास सुरुवात केली आहे.
बीबीसीवर आयकर विभागाची धाड पडल्यानंतर काँग्रेसने भाजपला घेरण्याचाही प्रयत्न केला आहे. त्यामुळे भाजपवर टीका करताना त्यांनी मोदी सरकार सूड उगवत असल्याची टीका त्यांनी केली होती.
नरेंद्र मोदी ज्या बीबीसीवर एकेकाळी विश्वास ठेवत होते, त्याच बीबीसीबाबत आता त्यांचे मत खराब झाल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. तर काँग्रेसचे नेते पवन खेडा यांनी बुधवारी सांगितले की, आरएसएसच्या शाखांप्रमाणेच ईडी, सीबीआय, आयटीच्याही वेगवेगळ्या देशांमध्ये शाखा असाल्याची शंका त्यांनी व्यक्त केली आहे.
भाजपने आणि या आयकर विभागाने देशाची चेष्टा केली असल्याची टीकाही त्यांच्यावर करण्यात आली आहे. त्याचवेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बीबीसीवरील आयटीची धाड हे दुर्देवी असल्याचे मत व्यक्त केले आहे.
बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांच्या आयकर विभागाने केलेल्या सर्वेक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. समाजसेवक मुकेश कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली आहे.