मुंबई: जळगाव वसतीगृहातील प्रकारावरुन अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी सभागृहात विरोधक आक्रमक होताना दिसले. भाजप नेते सुधीर मुनंगटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आक्रमक भाषेत गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी लक्ष्य केले. जळगावातील वसतीगृहात पोलिसांकडून मुलींना नग्न करुन नाचायला लावण्यात आले. या जागी तुमची किंवा माझी बहीण असती तर हा केवळ विचार करुन पाहा. तुम्ही गृहमंत्री असलात तरी असा प्रकार झाला असता तर तुम्ही खूनच केला असता, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले. (BJP leader Sudhir Mungantiwar slams HM Anil Deshmukh)
इतक्या घृणास्पद घटनेनंतरही राज्य सरकार फक्त नोंद घेऊ म्हणते. विरोधी पक्षातील आमदार काय मेलेल्या मनाचे आहेत का? आमचं मन जिवंत आहे. तुमच्या तळपायाची आग मस्तकात गेली पाहिजे. अशा प्रकारानंतर किती तासात संबंधितांवर कारवाई करणार, किती तासात करणार, हे सरकारने सांगायला पाहिजे. हे पाप तुम्हाला फेडावे लागेल, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
सध्या या प्रकरणात संबंधित लोकांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरु आहे. अहवाल आल्यानंतर लगेचच कठोर कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
गृहमंत्र्यांच्या या उत्तरावर सुधीर मुनगंटीवार यांनी हल्लाबोल गेला. आम्ही कारवाई करु, असे सांगायला ही घटना काही पाच मिनिटांपूर्वी घडलेली नाही. घटना होऊन बरेच तास उलटून गेले आहेत. त्यानंतरही पोलिसांकडून चौकशी होत नाही. अशी परिस्थिती राहिली तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी, अशी मागणी मला करावी लागेल, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
दरम्यान, भाजप आमदार श्वेता महाले यांनीही याप्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “जळगावमध्ये अतिशय निंदनीय घटना घडली आहे. जळगावच्या आशादीप वसतिगृहात अशी घटना घडणे खूप चुकीचं आहे. कर्मचाऱ्यांकडून मुलींना कपडे काढून नाचायला सांगतात हे अतिशय निंदनीय आहे आणि त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी. हे कृत्य करायला नकार देणाऱ्या महिलांना मारझोड केली जाते. या आरोपींवर कडक कारवाई करावी आणि सरकारने दखल घ्यावी. आपली सुरक्षा करणाऱ्या लोकांकडून अशी घटना होते ते खूप दुर्दैवी आहे” असं आमदार श्वेता महाले म्हणाल्या.
जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचा आरोप केला जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे या कृत्याचा व्हिडीओही सादर केला. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तातडीने दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले.
(BJP leader Sudhir Mungantiwar slams HM Anil Deshmukh)