संजय सरोदे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, अंतरवली सराटी- जालना | 16 जानेवारी 2024 : येत्या 20 जानेवारीला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील जालन्यातील अंतरवली सराटीहून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणसाठी मोर्चा काढला जाणार आहे. मुंबईत आंदोलन होणार आहे. या आंदोलनाआधी मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारला काही सवाल विचारलेत. मराठ्यांकडून सत्ता पाहिजे मग मराठ्यांचं आंदोलन मुंबईत का नको? तुम्ही का अडवणार…,असं मनोज जरांगे म्हणालेत. 20 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या आंदोलनबाबतही जरांगे यांनी भाष्य केलं आहे.
लोकांचे ट्रॅक्टर का मोजत आहेत? मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी बैठक घेतल्या का? तुम्ही मुंबईत येणाऱ्या मराठा समाजाला तुम्ही का अडवणार?,सरकार पुढे दोनच पर्याय आहेत. एकतर 6 कोटी मराठा समाजाच्या कत्तली कराव्या लागणार आहेत.केंद्र सरकार आणि राज्यसरकारला मराठे का नको आहेत? मराठ्यांची शांततेची आंदोलन का नको आहेत? असे सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारलेत.
आम्ही सरकारला चार शब्द घेण्यासंदर्भात सांगितलं होतं. ते काय घेऊन येतात ते बघू…फक्त चर्चा होत आहे काही निष्फळ होत नाही. समाज मोठा आहे चर्चा नाही. ज्या नोंदी सापडल्या आहेत परंतु किती जणांना दोन महिन्यात प्रमाणपत्र दिली. सरकार माझ्यावर डाव टाकण्याच्या तयारीत आहे. तशी मला खात्रीलायक माहिती मिळाली आहे. मी माहिती घेत आहे हे खरे आहे का? माझ्यावर ट्रॅप लावण्याची शक्यता आहे. मी हे अत्यंत जबाबदारीने बोलतोय, असं गंभीर विधान जरांगे पाटील यांनी केलं आहे.
मला शब्दामध्ये गुंतवायचं. आमच्या रॅलीमध्ये कुणालातरी घुसवायचं, असं मला त्यांचेच लोक आणि अधिकारी सांगतात. आम्ही सध्या सावध आहोत. मी मराठ्यांना सांगितलं आहे की, रॅलीमध्ये सावध राहा. सरकारचे काही मंत्री यामध्ये आहेत आणि मी त्याची खात्री करणार आहे. सरकारमधील काही मंत्र्यांनी आरक्षण द्यायचं नाही. असा विरोध दर्शवला आहे आणि मुंबई येऊ द्यायचे नाही, असं विधान मनोज जरांगे यांनी केलं आहे.