मुंबईः जेम्स लेनप्रकरणात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर आरोप करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राची माफी मागणी, अशी मागणी गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) वतीने करण्यात आली. पवारांनी या प्रकरणावर मुंबईत बोलताना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी मौन बाळगल्याचा दावा केला होता. मात्र, शिवशाहीर पुरंदरे यांच्यासह इतिहास तज्ज्ञांनी याप्रकरणी ऑक्सफर्ड प्रेसला ते वादग्रस्त पुस्तक मागे घेण्याचे मागणी करत लिहिलेले निषेध पत्र सादर करून मनसेने पवारांची कोंडी केलीय. एका अर्थाने शरद पवारांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर केलेले आरोप खोटे आहेत, असा दावा मनसेच्या वतीने करण्यात आला आहे. जेम्स लेनचं गलिच्छ लिखाण हे बाबासाहेब पुरंदरेंच्याच माहितीवर आधारित होते. आपण जे लिखाण केलं, त्याची माहिती पुरंदरेंकडून घेतल्याचं लेन यांनी म्हटलं. जेम्स लेनने हे उघड सांगूनही पुरंदरे यांनी त्याचा खुलासा केला नाही. त्यामुळे मी पुरंदरेंवर टीका केली असेल, तर मला त्याचं दुःख नाही, तर अभिमान वाटतो. त्यामुळे यावर कुणी काय म्हटलं असेल, तर मला त्याबद्दल काही सुचवायचे नाही, असे म्हणत अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना बुधवारी मुंबईत उत्तर दिले होते. पवारांचे हेच उत्तर मनसेने खोडून काढले आहे.
जेम्स लेनप्रकरणावर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी उघडपणे विरोधाची भूमिका घेतली होती. त्याबाबत 10/11/2003 रोजी हे पुस्तक मागे घेण्याची मागणी करणारे एक निषेध थेट ऑक्सफर्ड प्रेसला लिहिले होते. त्या पत्रावर स्वतः बाबासाहेब पुरंदरे यांची सही आहे. शिवाय खासदार प्रदीप रावत, ज्येष्ठ इतिहासकार जयसिंगराव पवार, निनाद बेडेकर, सदाशिव शिवदे, वसंत मोरे आदी मान्यवरांच्या सह्या आहेत. या पत्रात जेम्स लेनचे पुस्तक मागे घ्यावे. ते मागे न घेतल्यास भारत सरकारने या पुस्तकावर बंदी घालावी, अशी मागणीही केली आहे.
ऑक्सफर्ड प्रेसला लिहिलेल्या पत्रात असा उल्लेख आहे की, जेम्स लेनने त्याच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल दिलेली आक्षेपार्ह माहिती ही त्याची स्वतःची कुटील कल्पना आहे. हे वादग्रस्त पुस्तक प्रकाशनाने मागे घेण्यात यावे. अन्यथा या पुस्तकावर भारत सरकारने बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पत्रावर अशी मागणी करून सही करणारे तत्कालीन खासदार प्रदीप रावत वगळता सारे मान्यवर हे इतिहास तज्ज्ञ आहेत. एकंदर शिवशाही बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यावेळेसच आपली भूमिका विरोधी करून स्पष्ट केली होती, हे समोर येत आहे. या पत्राने तूर्तास तरी मनसेने शरद पवारांच्या दाव्यातली हवा काढून टाकली आहे. यावर पवार काय बोलणार, याची उत्सुकता आहे.