राज्यात सध्या लाडकी बहिण, लाडका भाऊ योजनेवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न चालवला आहे. लाडकी खुर्ची वाचवण्यासाठी हा प्रयोग होत असल्याचा घणाघात विरोधक करत आहे. तर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या एका ट्वीटने अजून मुद्दा उभा केला आहे. मुंबई पोलीस विभागात अश्वदल सुरु होणार असल्याचे एका वृत्ताचा आधार घेत, त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांचे ट्वीट सध्या चर्चेत आले आहे.
काय म्हणाले आव्हाड
आज बातमी आलेय की, मुंबई पोलीस दलातील अश्वदलाची पुनर्निर्मिती करणार! पूर्वीच्या मुंबईत पोलीस घोड्यावरून गस्त घालत होते. आता ती पद्धत पुन्हा सुरू करण्याचा निर्णय झाला असल्याचे वृत्तपत्रातील बातमीतून समजले. आता भ्रष्टाचार एवढा वाढलाय की घोड्याऐवजी ‘खेचरं’ येतील. जिथे माणसांना चालायला जागा नाही; तिथे घोडे कुठे नेणार आहेत? निर्णय घेता येतो, म्हणून असा निर्णय घ्यायचा ? ही नवीन योजना आहे, ” माझा लाडका घोडा” आणि हो, हे घोडे जेव्हा मुंबईत फिरतील; तेव्हा त्यांच्या मागे कुत्रे लागतील ते वेगळेच!!
आज बातमी आलेय की, मुंबई पोलीस दलातील अश्वदलाची पुनर्निर्मिती करणार! पूर्वीच्या मुंबईत पोलीस घोड्यावरून गस्त घालत होते. आता ती पद्धत पुन्हा सुरू करण्याचा निर्णय झाला असल्याचे वृत्तपत्रातील बातमीतून समजले. आता भ्रष्टाचार एवढा वाढलाय की घोड्याऐवजी ‘खेचरं’ येतील. जिथे माणसांना…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 2, 2024
काय आहे अश्वदलाचा निर्णय
मुंबई पोलीस आता विविध ठिकाणी घोड्यावरुन गस्त घालतील. त्याला माऊंटेड पोलीस युनिट असे गोंडस नाव देण्यात आले आहे. त्यासाठी राज्य सरकारने 36 कोटी रुपयांची तरतूद केल्याचे समोर येत आहे. या निधीतून पोलिसांसाठी 30 तंदुरुस्त आणि उमदे घोडे खरेदी करता येतील. या अश्वांसाठी सर्व सुविधांनी युक्त खास तबेला उभारण्यात येणार आहे. पोलिसांना घोडेस्वारीचे प्रशिक्षण देण्यात येईल. पोलिसांना घोड्यांचा आहार, निगा राखण्यासह गस्त घालण्याविषयीची बारीकसारीक माहिती देण्यात येईल.
सहा वर्षांपूर्वीच प्रयोग
मुंबईत ब्रिटीश राजवटीत अश्व दल कार्यरत होते. 2018-19 मध्ये अश्व दल पुन्हा सुरु करण्याचा प्रयोग करण्यात आला. जानेवारी 2020 मध्ये त्यासाठी 13 घोड्यांची खरेदी करण्यात आली होती. पण निधीच्या कमतरतेमुळे अश्व दलाकडे दुर्लक्ष झाले. वृद्ध घोड्यांची खरेदी, त्यांची निगा राखण्याचा प्रश्न आणि इतर समस्येंमुळे त्यातील सहा घोड्यांचा मृत्यू झाला. तर इतर पाच घोडे नंतर नाशिक प्रशिक्षण केंद्रात पाठवण्यात आले. देशात गुजरात, कोलकत्ता, कर्नाटक, हैदराबाद, चेन्नई येथील पोलिसांकडे असे अश्व दल आहे.