राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे मागच्या काही दिवसांपासून नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळांची पक्षात गळचेपी होतेय, हे कुणीही नाकारू शकत नाही. ते अनेक पदांचे मानकरी होऊ शकले असते. पण त्याबद्दल मला आता बोलायचं नाही. छगन भुजबळ यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे. तो कायम राहणार आहे. त्यांना जर घुसमटल्यासारख वाटतं असेल तर ते नक्की निर्णय घेतील, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
एका कार्यकर्त्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पाय धुतल्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कार्यकर्ते कधी कधी प्रेमापोटी वागतात. कुठल्या गोष्टीचं राजकारण करायचं कुठल्या नाही, हे कळायला हवं. नानाचं पाय धुवून हळद कुंकू लावून कोणी नारळ तर फोडला नाहीये ना… मग जाऊ देत. अजितदादांना टार्गेट केल जातंय. एखाद्या नेत्याला घेरून टीका करायची हे योग्य नाही. आमच्या आता विचारधारा वेगळ्या आहेत. पण तिथे त्यांना टार्गेट केलं जातंय हे खरंय, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
मराठा समाजाला आरक्षण देत असतानाच ओबीसींच्या आंदोलनाला धक्का लागू नये, अशी ओबीसी समाजाची इच्छा आहे. यासाठी उपोषण केलं जात आहे. ओबीसी समाजाच्या आंदोलनावर आव्हाडांनी प्रतिक्रिया दिलीय. आंदोलन करणाऱ्या ओबीसी नेत्यांनी सांगितलंय की, आम्ही काय मुंबईला येऊन मुख्यमंत्र्यांना भेटणार नाही. तुम्ही इकडे या, असं आव्हाड म्हणाले.
मुंबई उत्तर- पश्चिम लोकसभा मतदारसंघातील निकालावरून सध्या वाद सुरु आहे. यावर अमोल किर्तीकर पराभूत झालेले नाहीत. त्यांना पराभूत करण्यात आलेलं आहे. आरओ असणाऱ्या सूर्यवंशी मॅडम आहेत. त्यांचे लागेबांधे कोणाकोणाशी आहेत हे मला माहिती आहे. आरओकडूनच सिद्ध झालाय एव्हीएम मॅनेज होतं, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.