छगन भुजबळ यांनी सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी जात भेट घेतली. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाजात निर्माण झालेला तेढ कमी करण्यासाठी शरद पवारांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती छगन भुजबळ यांनी केली आहे. शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्या भेटीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा हा मोठेपणा आहे. भुजबळ यांनी काल टीका केली मात्र शरद पवार रुसून बसले नाहीत. एका मिनिटात त्यांना अपॉइंटमेंट देऊन त्यांना प्रवेश दिला. त्यांच्या दोघांमध्ये काय चर्चा झाली ते सांगता येणार नाही. पण ते दोघेही पोहोचलेले नेते आहेत त्यामुळे ते काय बोलतात ते जगाला कळणार नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
मला आज याचा आनंद आहे महाराष्ट्र च्या प्रगल्भ राजकारणात छगन भुजबळ यांनी आणि शरद पवार साहेबांनी पण संस्कृती टिकवून ठेवली. रुसून फुगून काही होत नाही आपण काही एकमेकांचे वैरी नाहीत. आपला वैचारिक मतभेद असतो. जर ते शरद पवारांची तब्येत कशी आहे हे विचारायला गेले असतील तर ही चांगलीच गोष्ट आहे. काल आम्ही त्यांना भेटायला जाणार होतो. मात्र त्यांनी माझी तब्येत बरी नसल्याने भेटायला येऊ नका, असा निरोप दिला होता. मात्र आज त्यांची तब्येत बरी नसतानाही जर ते भुजबळ यांना भेटत असतील तर भुजबळांचे पद देखील विचारात घ्यायला हवे. शरद पवार हे जादूची चावी आहेत शरद पवारांच्या चावी शिवाय कोणतं टाळा ओपन होत नाही, असंही आव्हाडांनी म्हटलं आहे.
शरद पवारांची कोणाशीच तुलना होऊ शकत नाही. दोघांनाही कोपऱ्याला गुळ लावून ठेवलेत. त्यामुळे फक्त दोघांनाही गुळ खाता येत नाहीये दिसतोय. दोन वर्षांपूर्वी सांगितलं होतं की हे पंतप्रधानांचं काम आहे पंतप्रधानांना जाऊन भेटा. पण ते आम्हाला कदाचित बौद्धिक दृष्ट्या छोटे समजत असतील. त्यांना छोट्या कार्यकर्त्यांच्या सल्ला आवडत नाही. जेव्हा एवढा मोठा सामाजिक प्रश्न उभा राहिला होता त्यावेळेस तुम्ही विचार करायला हवा होता की सगळ्या पक्षांना एकत्र घेऊनच निर्णय घेऊ. तुम्ही क्रेडिट गेम खेळायला गेले, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
एक ओबीसी समाजाशी बोलतोय एक मराठा समाजाशी बोलतोय. तुम्ही काय जाऊन बोलता हे तर समजलं पाहिजे मला जर त्यांच्याशी बोलायचं आहे तर तुम्ही काय बोलू मला हा ते समजायला हवं. मग निष्कारण शरद पवारांनी फोन केला म्हणून म्हणायचं. आम्हाला काय कामं नाहीत त्यांना काय कामं नाहीत आम्हालाही राजकारणात आता 35 वर्षे झाली. तुम्हाला आम्हाला ट्रॅपमध्ये अडकवायचं होतं, असंही आव्हाड म्हणाले.