मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी औरंगाबादच्या सभेत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (babasaheb purandare) यांच्यावर झालेल्या टीकेचा समाचार घेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला होता. शिवाजी महाराजांना घराघरात पोहोचवले त्या बाबासाहेब पुरंदरेंना शरद पवारांनी वृद्धापकाळात त्रास दिला असा आरोपही राज यांनी केला होता. राज यांच्या या आरोपांचा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी समाचार घेतला. बाबासाहेब पुरंदरेंचा विषय का काढता? त्यांचा विषय जेवढा काढाल तेवढे तुम्ही अडचणीत याल. पुरंदरेंना कोणी रेफर करत नाहीत. त्यांना संशोधक म्हणून मानलं जात नाही. 2000नंतरच्या इतिहास तज्ज्ञांनी पुरंदरेंना बाद केलं आहे, असा हल्लाबोल करतानाच पुरंदरे थोर साहित्यिक नव्हते. त्यांच्या एकाही कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार का मिळाला नाही? ते इतिहास संशोधक होते आणि त्यांनी एवढं मोठं काम केलं आहे तर त्यांना परदेशातील एखाद्या विद्यापीठाने पीएचडी का दिली नाही?, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला.
जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. भंडारकर इन्स्टियूट स्थापन झाली. ही संस्था अत्यंत मोठी आहे. पण ज्यांना शिवाजी महाराजांबद्दल द्वेष होता अशा लोकांच्या हातात संस्था गेली, असं सांगतानाच एखाद्या कादंबरीवरून इतिहास समजत नसतो. पुरंदरे थोर साहित्यिक नव्हते. त्यांची एकही कादंबरी ज्ञानपीठ मिळावी एवढी मोठी नव्हती. साहित्यिकांना ज्ञानपीठ मिळतो, मग पुरंदरेंना का मिळाला नाही? त्यांना पीएचडी का नाही मिळाली? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला.
एकाच माणसाचं नाव घेऊन महाराष्ट्र पेटवता? इतरांची पुस्तकेही वाचा. शहाजी राजे शुद्र होते असं जेम्स लेन म्हणतोय. पुस्तक वाचायचं असतं. पुरंदरेंनी मराठ्यांबद्दल काय म्हटलं ते जरा वाचा. पहिल्या चार आवृत्त्यांमध्ये पुरंदरेंनी लिहिलं होतं. मराठे आपली जहागीरदारी वाचवण्यासाठी आपल्या जवळच्यांनाही (मी तो शब्द वापरणार नाही) पाठवायला मागे पुढे पाहणार नाहीत. त्यांना लाज नाही, लज्जा नाही… पुरंदरेंनी असं लिहिलं होतं. हे जरा वाचा. बहुजन समाज शिकला आहे. कधी नव्हे तर लोक जेम्स लेनची पुस्तके वाचतील, असंही ते म्हणाले.
पुरंदरे ब्राह्मण असल्यामुळेच त्यांना टार्गेट केलं जातंय. या राज ठाकरे यांच्या आरोपांचंही आव्हाड यांनी खंडन केलं. कुसुमाग्रज ब्राह्मण आहेत. महाराष्ट्रातील सर्वात मोठी कविता त्यांनी लिहिली. त्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार, त्याची मांडणी त्याचे पॅरामीटर कसे असावेत याची सूचना शरद पवारांनी दिल्या. साहित्य संमेलनाचे सर्वात जास्त वेळा शरद पवार उद्घाटक होते. हे सर्व साहित्यिक विकले गेले होते असे म्हणाल. पण पवार सत्तेत किती वर्ष होते आणि नसताना किती वेळा बोलावलं हे जरा वाचा. इतिहासात लोकांनी ब्राह्मण्यवादाला विरोध केला. ब्राह्मणांना नाही. डांगे, ना. गो. गोरे, एसएम जोशी, आचार्य अत्रे, मृणालताई, रांगणेकर ताई, गोदावरी परुळेकर खूप नावे आहेत. मृणाल गोरे यांच्याबरोबर साहेबांचे संबंध कसे होते. दोघे भाऊ बहिणीसारखे वागायचे आणि विरोधी पक्षात असताना कसे हल्ला करायचे हे महाराष्ट्राने पाहिलं आहे. हा द्वेष नसायचा. सकाळची भांडणं, संध्याकाळी ते मिटून जायचे, असं ते म्हणाले.