ठाणे : बँकेबाहेर फूस आवून आणि गाडीच्या काचेला टकटक करून नागरिकांना लुटणारी आंतरराज्य टोळीला कल्याण पोलिसांनी अटक केली आहे. टकटक गँगच्या नावाने ओळखली जाणाऱ्या या टोळीतील 9 जणांना प्रथमच पोलिसांच्या हाती लागले आहेत. महाराष्ट्रात या टोळीवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. पण आतापर्यंत पोलिसांच्या हातावर तुरी देऊन लूट करणाऱ्या या टोळीच्या अखेर मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
टोपी गँग, चड्डी गँग, बनियान गँग तुम्ही पहिली असेल पण काही वर्षांपासून चोरट्यांनी चोरीचा नवा फंडा सुरु केला. या माध्यमातून चोरटे बँकेबाहेर उभे असतात, त्यांचे काही साथीदार बँकेत पैसे भरण्यासाठी आणि काढण्यासाठी आलेल्या लोकांवर लक्ष ठेवून असतात. पैसे घेऊन बाहेर पडणाऱ्या व्यक्तीची रेकी केली जाते आणि त्याला लुटलं जातं.
बँकेत रेकी करणारे साथीदार मोबाईलवर आपल्या साथीदारांच्या संपर्कात असतात. फूस लावून लोकांकडून पैसे घेऊन चोरटे पसार होतात. एवढंच नाही, तर चारचाकी गाड्या उभ्या असताना किंवा कोणी गाडी चालवत असताना थांबवून काचेला टकटक करतात. जेव्हा तो माणूस आपल्या गाडीची काच खाली घेतो, त्या माणसाकडील मोबाईल आणि इतर वस्तू घेऊन हे चोरटे पसार होतात. दररोज होणार्या या गुन्ह्यांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. अखेर कल्याण परिमंडळ 3 चे डीसीपी विवेक पानसरे यांच्या पथकाला यश आलं. कल्याण डीसीपी पथकाने टकटक गँगच्या 9 जणांना अटक केली.
मूळ आंध्र प्रदेशचे राहणारे संजय नायडू, बेन्जिमन इर्गदिनल्ल, दासू येड्डा, सालोमन गोगुला, अरुणकुमार पेटला, राजन गोगुल, याकुब मोशा, डॅनियल अकुला, इलियाराज केशवराज हे ज्या शहरात वास्तव्य करतात त्या ठिकाणी आधी मजुरीचे काम करतात, 4 ते 5 दिवस रेकी करतात आणि आपला चोरीचा धंदा सुरु करतात. या आरोपींना हिंदी, मराठी, कन्नड, इंग्लिश अशा विविध भाषांचं ज्ञान आहे. त्याचा फायदा हे घेतात. या 9 जणांच्या टोळीने महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत.
टकटक गँगची एवढी मोठी टोळी याआधी कधीही पोलिसांच्या हाती लागली नव्हती. या 9 जणांच्या अटकेनंतर अनेक गुन्हे उघडकीस येणार आहेत.