धावतपळत निघाली, पण घरी पोहोचलीच नाही, लोकलमधला प्रवास ठरला अखेरचा; अंबरनाथ-बदलापूर दरम्यान काय घडलं?

| Updated on: Oct 23, 2024 | 11:02 AM

अंबरनाथ बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधून पडून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

धावतपळत निघाली, पण घरी पोहोचलीच नाही, लोकलमधला प्रवास ठरला अखेरचा; अंबरनाथ-बदलापूर दरम्यान काय घडलं?
Follow us on

Mumbai Local Women Death : अंबरनाथ बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधून पडून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऋतुजा गणेश जंगम असे या मृत महिलेचे नाव आहे. ती कर्जतमध्ये राहणारी होती. मंगळवारी रात्री ८.३० च्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेमुळे मध्य रेल्वेवरील लोकल ट्रेनच्या गर्दीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, ऋतुजा ही एका खासगी ट्रॅव्हल कंपनीत कामाला होती. ती ठाण्याहून कर्जत लोकलने परतत असताना अंबरनाथ रेल्वे स्थानकात गर्दीच्या रेट्यामुळे खाली उतरली. पण घरी जायला उशीर झालाय हे लक्षात येताच ती पुन्हा त्याच लोकलमध्ये चढली. पण गर्दीमुळे तिला आतमध्ये शिरताच आले नाही. ती दारातच उभी राहिली. अंबरनाथ स्थानकातून ट्रेन सुटताच अवघ्या काही अंतरावर गर्दीमुळे तिचा हात सटकला आणि ती खाली पडली.

या अपघाताची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तिला उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या आठवड्यात एका तरुणाचा बळी

गेल्या आठवड्यातही मुंबई लोकलच्या गर्दीमुळे एका तरुणाला जीव गमवावा लागला होता. मुंबई लोकलमधून पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती. डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली होती. मृत तरुण मुंबई लोकलच्या दरवाजाजवळ उभा होता. गर्दीमुळे अचानक त्याचा हात सटकला आणि तो धावत्या लोकलमधून खाली पडला.आयुष जतीन दोशी (वय, २०) असे त्या मृत तरुणाचे नाव होते. आयुष हा लोकलमधून पडल्याची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी पोहोचून त्याला जखमी अवस्थेत डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

दरम्यान मध्य रेल्वेच्या बहुतांश लोकल गाड्या या संध्याकाळी उशिरा धावत असतात. तसेच संध्याकाळी कामावरुन घरी परतणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे लोकलला कायमच गर्दी पाहायला मिळते. अनेकदा लोकल ट्रेनमध्ये पाय ठेवण्याइतकीही जागा नसते. त्यातच एखादी लोकल सुटली तर दुसरी लोकल कधी किती वाजता येईल, वेळेत येईल की नाही, याचा काहीही पत्ता नसतो. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावर राहणारे अनेक प्रवाशी हे कायम जीव मुठीत घेऊन प्रवास करत असतात.