मुंबई : चिथावणी देणारं ट्वीट माझं नाहीच, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले. त्यानंतर अमित शहा यांनी चौकशीचे आदेशही दिलेत. विरोधक म्हणतात, व्हेरिफाईड अकाउंटवरचं ट्वीट खोटं कसं. सीमावादावरून झालेल्या बैठकीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांचं ट्वीट फेक असल्याचं सांगितलं. त्यावरून विरोधकांनी सवाल केलेत.
महाराष्ट्राला चिथावणी देणारे ट्वीट माझ्या अकाउंटरून झालेले नाहीत. ते अकाउंट माझं नाही, असं बोम्मई म्हणालेत. पण, ज्या अकाउंटवरून ते ट्विट आलं ते ब्ल्यू टीक आहे. याचा अर्थ हे अकाउंट ट्विटरकडून व्हेरिफाईड झालेलं आहे. त्यावर बसवराज एस. बोम्मई असं नाव लिहिलेलं आहे.
गेले १५-२० दिवस हा प्रश्न चिघळला जातोय. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं ट्वीट हॅक झालं होत का, याची चौकशी होईल. पण, खुलासा करायला इतके दिवस का लागले, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. ट्वीटरवरून जखमेवरती फुंकर नव्हे, तर मिठ चोळलं गेल्याचंही त्यांनी सांगितलं.
अमित शहा यांच्या बैठकीनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या ट्वीटर हँडलवर हे ट्विट आहे. ते अद्याप डिलीट करण्यात आलेलं नाही.
हे वादग्रस्त ट्विट असं होतं, महाराष्ट्राच्या शिष्टमंडळानं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानं काही फरक पडणार नाही. महाराष्ट्रानं यापूर्वीही असा प्रयत्न केला आहे. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. कोर्टात आमची कायदेशीर बाजू मजबूत आहे. आमचं सरकार सीमावादावर कोणतीही तडजोड करणार नाही. या ट्विटमुळं महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्नावर वादात तेल ओतण्याचं काम केलं.