माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपवासी झाले आहेत. लोकसभेपूर्वी त्यांनी कमळ हातात घेतले. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी नांदेडमध्ये नव्या दमाने सुरूवात केली आहे. लोकसभेची जागा भाजपला येथे राखता आली नाही. त्यातच मित्र शत्रू झाले, तर शत्रू मित्र झाल्याने नांदेडच्या राजकारणाचा कुणाला काही थांगपत्ता लागेना झाला आहे. त्यातच आता अशोकराव चव्हाण यांनी एका सभेदरम्यान केलेल्या वक्तव्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. काय म्हणाले चव्हाण?
विधानसभा, लोकसभेसाठी मोठी फिल्डिंग
नांदेड जिल्ह्यात अशोकराव चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर समीकरणं बदलली. वसंतराव चव्हाण यांनी करिष्मा केला. काँग्रेसकडे ही जागा खेचून आणली. पण त्यांच्या अकाली निधनाने लोकसभेची पोकळी पुन्हा तयार झाली. वसंत चव्हाण यांच्या मुलाला उमेदवारीसाठी शिफारस करण्यात आली आहे. काँग्रेसने तसा ठराव एकमताने पास केला आहे. आता काँग्रेसचा उमेदवार ठरला असला तरी भाजपकडून दोन तुल्यबल नेते समोर आहेत. माजी खासदार प्रतापराव चिखलीकर आणि सध्याचे राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांची नावे पुढे आहेत. त्यातच चिखलीकर इच्छुक नसतील तर भाजपकडून पोटनिवडणुकीत अशोकराव यांचे नाव पुढे करण्यात येत आहे. भाजपमधील राज्य कार्यकारिणीतील काही सदस्यांनी त्याला दुजोरा दिला आहे.
मी जिवंत राहिलो तर तुम्ही राहाल
काँग्रेसमधील अनेकांनी अशोकरावांना लोकसभेत धक्का दिला होता. त्यांना भाजपमध्ये जाण्याचा निर्णय रुचला नव्हता. त्यानंतर अजूनही काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या पचनी पडलेला नाही. अशोकराव चव्हाण यांना घेतल्यानंतर नांदेडची लोकसभा ताब्यात येईल, हा आशावाद पण फोल ठरल्याचा आरोप काँग्रेसमधील नेते आजही करतात. दरम्यान नांदेडमध्ये एका कार्यक्रमात अशोकरावांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
काय म्हणाले चव्हाण?
“विकासात्मक कामं करण्याच्या अपेक्षा आहेत. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अशोक चव्हाण सदैव तुमच्या पाठीशी असल्याचे मी जाहीरपणे सांगतो. या मुद्दावर आपले कुणाशीच काहीच मतभेद नाहीत. पण विरोधक जिल्ह्यात या गोष्टी अशोकरावांमुळे झाल्या नाहीत, त्या झाल्या नाहीत, अशी यादीच विरोधकांनी केली आहे. माझं नाव घेतल्याशिवाय काही लोकांना करमत नाही. मी समजा उद्या नसेलच राजकीय क्षेत्रात तर मग तुम्ही उद्या कुणाला बोलाल? मलाही जिवंत ठेवा मी जिवंत राहिलो तर तुम्ही राहाल. मी संपलो तर तुम्हाला बोलायला काय राहणार नाही. म्हणून मला संपवू नका, मी तुम्हाला नाही टीका करणाऱ्यांना बोलतोय,” असे वक्तव्य अशोकराव चव्हाण यांनी केलं आहे.