मुबंई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अभिनेत्री केतकी चितळेला (Ketaki Chitale) आज कोर्टात हजर केल्यानंतर तिला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. आक्षपार्ह पोस्टप्रकरणी केतकीच्या विरोधात राज्यभरात निरनिराळ्या ठिकाणी तिच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता वेगवेगळ्या ठिकाणचे पोलीस (Mumbai Police) तिचा ताबा घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे केतकीचा जेलमधील मुक्काम वेगवेगळ्या जिल्ह्यात असण्याची आणि वाढण्याचीही शक्यता आहे. आज केतकीला ठाणे कोर्टाने न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर, तिला वैद्यकीय तपासणीसाठी जेजे रुग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी करुन तिला ठाण्याच्या जेलमध्ये नेण्यात येणार आहे. त्यानंतर ठाण्यातून तिला गोरेगाव पोलीस तिला ताब्यात घेणार आहेत.
आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी केतकीच्या विरोधात पुण्यातही दाखल झालेल्या गुन्ह्यांप्रकरणी तिला ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेसाठी पुणे पोलीस, ठाणे गुन्हे शाखेत हजर झाले होते. पुणे पोलिसांच्या एका टीमने केतकीशी चर्चा केल्याची माहितची आहे. आता गोरेगाव पोलिसांनंतर केतकीचा ताबा पुणे पोलिसांकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
अभिनेत्री केतकी चितळेविरोधात राज्यभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात ठाणे, गोरेगाव, पुणे, धुळे, नाशिक, उस्मानाबाद आणि इतरही काही ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता तिला इतर ठिकाणचेही पोलीस ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. खासकरून मुंबईतील गोरेगाव पोलीस आणि पुणे पोलिसांकडून केतकी चितळेला ताब्यात घेण्यासाठी कसोटीने प्रयत्न सुरु आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वीच एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात पहिला गुन्हा हा मुंबईत दाखल झाला. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल होण्याची मालिका सुरू झाली. आधी मुंबई, त्यानंतर सातारा, त्यानंतर कोल्हापूर, असा अनेक ठिकाणच्या पोलिसांना सदावर्तेंचा ताबा देण्यात आला. आताही तशीच काही परिस्थिती आहे. केतकीवरही अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे तिलाही इतर ठिकाणचे पोलीस ताब्यात घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे केतकीचा वनवास इतक्यात तरी संपायचं दिसत नाही.
आज ठाणे पोलिसांनी केतकी चितळेला कोठडी संपल्यानं ठाणे कोर्टात हजर केलं. यावेळी कोर्टात केतकीने नाही तर तिच्या वकिलांनी युक्तीवाद केला. त्यानंतर कोर्टाने तिची रवानगी ठाणे कोर्टाने न्यायालयीन कोठडीत केली आहे.