मुंबई : आयएनएस विक्रांत (INS Vikrant Case) कथित घोटाळ्यात भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांची मुंबई पोलिसांकडून आज चौकशी पार पडलीय. मुंबई पोलिसांनी सोमय्यांची साडेतीन तास कसून चौकशी केली. संजय राऊतांनी (Sanjay Raut) सोमय्यांवर 28 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. मात्र चौकशी संपवून बाहेर आल्यानंतर लगेच सोमय्या यांनी पुन्हा ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. पोलिसांना तपासात मी पूर्ण सहकार्य करत आहोत, करत राहणार आणि न्यायालयाचा सन्मानही करत राहणार, असे सोमय्या म्हणाले. तसेच नंदकिशोर चतुर्वेदीला ठाकरे परिवाराने पलायन किंवा लपवण्याचा अट्टाहास केला आहे. आज ना उद्या हे सर्व बाहेर येणार आहे.असा थेट इशाराही सोमय्या यांनी दिला. शुक्रवारी मी दिल्लीत जाऊन नंदकिशोर चतुर्वेदीची माहिती मी केंद्र सरकारला देणार, असा कडकडीत इशाराही किरीट सोमय्या यांनी दिला आहे.
तसेच गुरूवारपर्यंत पोलिसांना सहयोग करण्यासाठी मला बलावलं आहे. मुंबई पोलिसांना हवी असलेली सर्व माहिती मी त्यांना देत आहे. अजून चार दिवस मला न्यायालयानो पोलिसात हजेरी लावायला सांगितलं आहे. पण यांना 57 कोटी तर सोडा यांना 57 लाखांचा आकडाही मिळत नाही. न्यायालयात ज्यावेळी युक्तीवाद झाला, त्यावेळी मला अटक करण्याची मागणी करत होते. त्यावेळी न्यायालय म्हणालं तुमच्याकडे त्या व्यवहाराची पुरेशी माहिती नाही. तर तुम्ही अटक कशी करू शकता. त्यामुळे न्यायालयाने यांना चौकशीसाठी चार दिवसांचा वेळ दिला आहे, असेही सोमय्या म्हणाले.
तर नंदकिशोर चतुर्वेदीशी उद्धव ठाकरेंच्या महुण्याचे संबंध तर मी बाहेर काढलेच आहेत. त्यानंतर मी आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांचे आणि नंदकिशोर चतुर्वेदीचे व्यवहारही बाहेर काढले. आता मी जो घरांचा घोटाळा बाहेर काढला आहे. त्यातही नंदकिशोर चतुर्वेदीचा हात आहे. नदकिशोर चतुर्वेदीला लपवण्यासाठी सरकारने काहीतरी कारस्थान केले आहे. आमचे काम हे महाराष्ट्रातील माफियाला थांबवण्याचे आहे. ठाकरे परिवाराकडून महाराष्ट्राची लूट सुरू आहे. माफीय घोटाळेबाज नेत्यांवर कारवाई व्हावी, यासाठी माझं लक्ष कायम आहे. नंदकिशोर चतुर्वेदी बाहेर आल्यास कित्येक माहिती बाहेर येणार. यात ठाकरे सरकार आणि ठाकरे परिवाराचे घोटाळे बाहेर येणार. संजय राऊतांवर काय बोलणार ते तर पळून गेले. आतापर्यंत एकही पुरावा दिला नाही, अशी घणाघाती टीका सोमय्या यांनी चौकशीनंतर केली आहे.