लोकसभा निडवणुकीच्या पराभवाचे विश्लेषण अजूनही सुरु आहे. ही हार महायुतीच्या जिव्हारी लागलेली आहे. महाविकास आघाडीला मिळालेले यश निर्भेळ नसल्याचा दावा महायुतीकडून करण्यात येत आहे. उद्धव सेनेला मुंबईत मिळालेल्या विजयात वोट जिहादचा मोठा वाटा असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. यापूर्वी पण त्यांनी ठाकरे सेनेवर आरोपाचा बाण चालविला आहे. आता त्यांनी नवीन आकडेवारीसह महाविकास आघाडीचा उमेदवार कसा निवडून आला याचे गणित मांडले आहे. अर्थात पावसाळी अधिवेशनात त्याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाहीत. वादाला पुन्हा नव्या मुद्याने हवा देण्यात आली आहे.
किरीट सोमय्यांचा आरोप काय?
नया नगर मीरा रोड येथील हैदरी चौक, बैतूल अब्बास, फातिमा मंजिल, मीरा तबस्सुम, नसरीन अपार्टमेंट, अश्या 24 बूथ क्षेत्रामध्ये एकनाथ शिंदे शिवसेना भाजप युतीच्या उमेदवाराला 354 मतं मिळाली. तर उद्धव ठाकरे सेनेच्या उमेदवाराला 12,052 मतं मिळाली. या नयानगर येथे राम मंदिर प्राण प्रतिष्ठा प्रतिष्ठेचा वेळेला दंगल घडविण्यात आली होती.वोट जिहादची जीत म्हणजे उध्दव ठाकरे सेनेची जीत, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.
यापूर्वी काय केला होता आरोप?
यापूर्वी सोमय्यांनी दक्षिण मुंबई लोकसभा निवडणुकीतील मतदानाची गोळाबेरीज समोर मांडली होती. या मतदारसंघातून अरविंद सावंत यांनी बाजी मारली आहे. त्यात वोट जिहादचा आरोप सोमय्यांनी केला होता. या भागात यामिनी जाधव यांना 191 मते तर सावंत यांना 311 मते मिळाली होती. मुंबईतील मुंबादेवी येथेही उद्धव ठाकरे सेनेच्या बाजूने मतदान झाले. तर भेंडीबाजार, मोहम्मद अली रोड, चोर बाजार येथील 38 बूथवर यामिनी जाधव यांना खातंही उघडता आले नाही. त्यांना एक अंकी मतं मिळाली नसल्याचे सोमय्यांनी स्पष्ट केले होते.
काँग्रेसने केली तक्रार
दक्षिण मुंबई मतदारसंघातील वोट जिहादचे वक्तव्यावरुन वाद झाला होता. हा मतदारांचा अपमान असल्याचा आरोप करण्यात येत होता. मुंबईतील या वक्तव्याचे पडसाद दोन आठवड्यांपूर्वी अमरावतीत दिसून आले होते. स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सोमय्या यांच्याविरोधात अमरावतीमधील कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर आता सोमय्या यांनी पुन्हा महाविकास आघाडीला टार्गेट केले आहे.