मुंबई: शिवसेना नेते रामदास कदम यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात भाजप नेते किरीट सोमय्यांना मटेरियल पुरविल्याचा आरोप रत्नागिरीतील खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केला होता. त्यावर किरीट सोमय्या यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. रामदास कदम यांनी मला कागदपत्रं दिली असं मी म्हणणार नाही. पण मला कागदपत्रे कुणी दिली हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच शोधावं, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सोमय्यांना शिवसेना नेत्यांच्या विरोधात कागदपत्रं कुणी पुरवली? याबाबतचं गूढ अधिकच वाढलं आहे. (kirit somaiya reaction on ramdas kadam statement)
किरीट सोमय्या आज ईडी कार्यालयात आले होते. यावेळी त्यांनी ईडीकडे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार केली आहे. ईडी कार्यालयातून बाहेर आल्यावर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं. मला कागदपत्र कोणी दिली याचा तपास उद्धव ठाकरे यांनी करावा. त्यांच्याकडे सगळी यंत्रणा आहे. मला कागदपत्र देणाऱ्यांना मी प्रोटेक्ट करतोय. मला रामदास कदम यांनी कागदपत्रे दिली असं मी म्हणणार नाही. मला वेगवेगळी लोक कागदपत्रं देतात. मिलिंद नार्वेकर यांच्यासंदर्भातली कागदपत्रं मला कोणी दिली तेही त्यांनी शोधावं, असं सोमय्या म्हणाले.
हसन मुश्रीफ आणि त्यांचा कुटुंब तसेच त्यांचे जावई यांच्यामार्फत बेनामी कंपनीच्या माध्यमातून जे व्यवहार झालेत ते आता मी ईडीला दिले आहेत. काही दिवसांपूर्वी सरसेनापती हंबीरराव कारखान्याची माहिती मी ईडीला दिली होती. आज आप्पासाहेब नलवडे साखर कारखान्याची माहिती ईडीला दिली आहे. ब्रिक्स इंडिया कंपनीला हा कारखाना चालवायला दिला आहे. त्यातून बेनामी व्यवहार झाले आहेत. ज्या कंपन्यांना मान्यता नाही अशा शेल कंपन्यांच्या माध्यमातून व्यवहार झाला, असा दावा त्यांनी केला.
सोमय्या यांना कोल्हापूरमध्ये जाऊ नये म्हणून मुंबईत स्थानबद्ध केलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मला घरात डांबून ठेवलं. एसीपी मिलिंद खेतले यांनी बोगस ऑर्डर दाखवली होती आणि मला थांबवलं होतं. मी ह्युमन राईट कमिशनकडे त्यासंदर्भात तक्रार करणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, वैभव खेडेकर यांनी केलेले आरोप रामदास कदम यांनी फेटाळून लावले आहेत. अनिल परब यांचा जो रिसॉर्ट आहे. त्याची तक्रार किरीट सोमय्यांकडे मी केली, असं खेडेकर यांचं म्हणणं आहे. खेडेकरांचं हे म्हणणं हस्यास्पद आहे. गेल्या दहा वर्षात मी सोमय्यांचं थोबाड पाहिलं नाही. भेटणं तर लांबच झालं. सोमय्यांना टीव्हीवर कधी तरी पाहतो. मी समोरून अंगावर जाणारा माणूस आहे. मी कधी कुणाच्या पाठित खंजीर खुपसला नाही हे सर्व महाराष्ट्र जाणून आहे. मी अनिल परबच्या हॉटेलची तक्रार का करणार? तसं केल्यानं काय साध्य होणार आहे? अनिल परब हे माझ्या पक्षाचे मंत्री आहेत. याचं मला भान आहे. मी कडवा शिवसैनिक आहे, असं रामदास कदम म्हणाले होते. (kirit somaiya reaction on ramdas kadam statement)
संबंधित बातम्या:
VIDEO: अनिल परबांच्याविरोधात रामदास कदमांनीच सोमय्यांना दारुगोळा पुरवला? कदमांची पहिली प्रतिक्रिया
(kirit somaiya reaction on ramdas kadam statement)