मुंबईतील घाटकोपर येथील बेकायदेशीर विशालकाय होर्डिंगने 14 निष्पापांचा बळी घेतला. त्यात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यात किती जण जायबंदी झालेत, हा आकडा समोर आलेला नाही. आता राजकीय वर्तुळात या घटनेचे पडसाद उमटत आहे. भाजप नेते किरीट सोमय्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत गौप्यस्फोट केले. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आरोपांची राळ उडवली. आता हा मुद्या राजकीयदृष्ट्या अधिक तापणार हे नक्की…
SIT चौकशीची केली मागणी
घाटकोपर येथे जे बेकायदेशीर होर्डिंग लावण्यात आले, त्याला प्रत्यक्षात 40 बाय 40 ची परवानगी होती. पण ते 120 बाय 120 चे उभारण्यात आले. हेच होर्डिंग BPCL पंपावर कोसळले. भाजप नेते किरीट सोमय्या यांना याप्रकरणात अनेक गौप्यस्फोट केले. त्यांनी आरोपांची राळ उडवली. उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. या सर्व प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी सोमय्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
400 हून अधिक बेकायदेशीर होर्डिंग
सध्या शहरात 400 हून अधिक बेकायदेशीर होर्डिंग असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात राजकारण करायचे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पण या सर्व प्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली. तत्कालीन राज्य सरकारने नियमांना बगल देत, ते धाब्यावर बसवत परवानगी दिल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
भावेश भिडे फरार
या होर्डिंगप्रकरणातील भावेश भिडे हा कुटुंबियांसह फरार झाला आहे. त्याच्याविरोधात पंतनगर पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. त्यांनी प्रकरणात तत्कालीन मुंबई पालिका आयुक्त निधी चौधरी यांचे नाव पण घेतले. भावेशने बेकायदेशीर होर्डिंग उभारल्याचा आरोप त्यांनी केला. त्याला तत्कालीन सरकारचा वरदहस्त असल्याचा आरोप त्यांनी केला.
उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
उद्धव ठाकरे यांनी बेनामी कंपनीला पेट्रोल पंप चालवण्यासाठी दिला. सरकारी जागेवर पोलीस कल्याण निधीसाठी कायद्याला धाब्यावर बसवत परवानगी देण्यात आल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. या पंपा शेजारची झाडे कापण्यात आली, मुंबई महापालिकेच्या होर्डिंगचा पाया कमकुवत असला तरी भ्रष्टाचाराचा पाया मजबूत असल्याचा आरोप त्यांनी केला. एप्रिल 2024 मध्ये मी पाठपुरावा केला होता. त्या मालकाला होर्डिंग काढण्यास सांगितले होते, असे ते म्हणाले. शहरात अनेक ठिकाणी 120 फूट उंचीची होर्डिंग्स आहेत. अशी बेकायदेशीर होर्डिंग्स हटविण्याची मागणी त्यांनी केली.