गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडलं. आता एक्झिट पोल समोर आलेत. टीव्ही ९ च्या एक्झिट पोलनुसार गुजरातमध्ये मोदी मॅजिक कायम राहणार आहे. पुन्हा एकदा कमळंच फुलण्याचा अंदाज आहे. गुजरातमध्ये एकूण १८२ जागा आहेत. बहुमतासाठी ९२ जागा हव्यात. भाजपला १२५ ते १३० जागा मिळतील, असा एक्झिट पोल टीव्ही ९चा आहे. टीव्ही ९ च्या एक्झिट पोलनुसार, काँग्रेसला ४० ते ५० जागांवर समाधान मानावं लागेल. यामुळं काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकावर राहावं लागेल, अशी शक्यता आहे.
आपनं सत्ता स्थापनेचा दावा केला होता. पण, त्यांना फक्त तीन ते पाच जागांवर समाधान मानावं लागेल, असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. केजरीवालांची आम आदमी पक्ष तिसऱ्या स्थानी राहील. यातून पुन्हा एकदा भाजपची सत्ता येईल, असा अंदाज आहे.
टक्केवारीचा विचार केल्यास भाजपला ४७ टक्के मतं मिळतील. काँग्रेसला ३५ टक्के मतं मिळतील, असा अंदाज आहे. तर १२ टक्के मतं आम आदमी पक्षाला आणि ६ टक्के मत इतरांना मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपला २६ ते ३१ जागांचा फायदा होताना दिसतो. काँग्रेसला २७ ते ३७ जागांचं नुकसान होईल, असा अंदाज आहे. रिपब्लिकच्या एक्झिटपोलमध्येही भाजपला १२८ ते १४८ जागा मिळतील, असा अंदाज आहे. काँग्रेसला ३० ते ४२ जागा मिळतील, असा रिपब्लिकचा अंदाज आहे. आम आदमी पक्षाला २ ते १० जागा मिळतील, तर अपक्षांना तीन जागा मिळतील, असा अंदाज रिपब्लिकनं व्यक्त केलाय.
नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये पूर्ण ताकद लावली. राहुल गांधी यांनी शेवटच्या टप्प्यात प्रचार केला. अऱविंद केजरीवाल यांनीही धुवाधार प्रचार केला. आता मतदान पार पडलं. ८ डिसेंबरला निकाल लागेल. तेव्हा नेमके आकडे समोर येतील.