मराठा फॅक्टरने लोकसभेत अनेकांची सत्ता समीकरणं बिघडवली. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात त्याची झळ विशेषतः महायुतीला बसली. महायुतीने थेट जनभावनेला हात घालत काही योजनांची दणक्यात सुरुवात केली आहे. त्यात लाडक्या बहीण योजनेने कमाल केली आहे. लोकसभा पराभवाचे चिंतन, मनन केल्यानंतर महायुतीला एक यशाचा फॉर्म्युला हवाच होता. तो महायुतीला गवसल्याची चर्चा राज्यात रंगली आहे. गावाच्या पारापासून ते मंत्रालयापर्यंत लाडकी बहीण योजनेची चर्चा आहे. मध्यप्रदेशाचा हा फॉर्म्युला सत्ताधाऱ्यांना पुन्हा सत्ता टिकवण्यासाठी उपयोगी ठरेल का? लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरेल का? सत्तेच्या सारीपाटावरील अपडेट तरी काय?
सावत्र भावाच्या कह्यात येऊ नका
शनिवारी महायुतीने लाडकी बहीण योजनेचा पुण्यातील बालेवाडीत मोठा कार्यक्रम घेतला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. या योजनेत अडथळे आणण्यासाठी त्यांनी काय काय कारनामे केले याचा पाढाच वाचला. त्यांनी राज्यातील बहिणींना त्यांच्या कह्यात न येण्याचे, त्यांचा भुलथापांना बळी न पडण्याचे आवाहन केले. ही योजना विधानसभेचे चित्र पालटून टाकेल असा विश्वास महायुतीच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे.
दोन हप्ते केले जमा
मध्यप्रदेशाच्या धरतीवर राज्यात लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. राज्यात 1 जुलैपासून ही योजना सुरु झाली. रक्षाबंधनापूर्वी महिलांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. 14 ऑगस्ट पासून महिलांना 3000 रुपयांची भेट मिळाली. 15 ऑगस्ट रोजी 30 लाख महिलांच्या खात्यात दोन हप्ते जमा झाले. 16 ऑगस्ट पर्यंत 80 लाख महिलांच्या खात्यात पैसे तर 17 ऑगस्ट पर्यंत एक कोटी 25 लाख महिलांच्या खात्यात पैसे पोहचले. अजूनही मंजूरी मिळालेल्या महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे.
ज्या बहिणीच्या खात्यात पैसे गेले नसतील त्यांच्या खात्यात पैसे जाईल. ज्यांचं आधार लिंक राहिलं असेल त्यांनाही पैसे मिळेल. 31 ऑगस्ट पर्यंत मुदत आहे. ऑगस्टमध्ये अर्ज भरल्यावर तुम्हाला जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे मिळतील. तुम्हाला दर महिन्याला दीड हजाराचा माहेरचा आहेर मिळणार आहे, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
मध्यप्रदेशात फॉर्म्युला हिट
मध्यप्रदेशात जनमत भाजपविरोधात असल्याचे सर्व्हेक्षण सांगत होते. त्यापूर्वीच तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी लाडली बहन योजना सुरु केली. त्याचा मोठा फायदा भाजपला झाला. विधानसभा निवडणुकीत 163 जागा जिंकत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. तर लोकसभेला मध्य प्रदेशात भाजपला फटका बसणार अशी चर्चा असताना भाजपने सर्व 29 जागांवर विजय मिळवला. हा यशाचा हुकमी फॉर्म्युला असल्याचे बोलले जाते. त्याची प्रचिती आता राज्यात दिसणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
विरोधकांचा आरोप काय
सत्ताधाऱ्यांना सत्ता जाण्याची भीती असल्यानेच त्यांना लाडकी बहीण आणि लाडका भाऊ आठवल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. निवडणुकीच्या तोंडावरच सत्ताधाऱ्यांना जनतेची आठवण झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. योजनेतील पैसे काढून घ्या, पण आतापर्यंत दुर्लक्ष केल्याचा सत्ताधाऱ्यांना जाब विचारा, असे आवाहन विरोधकांनी केले आहे. मध्य प्रदेशमध्ये तीन महिने लाडली बहन योजना सुरु झाल्यानंतर ती बंद केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या योजनेची सध्या राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांना निवडणुकीत होईल का? ही योजना गेमचेंजर ठरणार का? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.