लाडक्या बहीण योजनेने लोकसभेचे मळभ धुवून काढण्यासाठी महायुती सज्ज झाली आहे. या योजनेने महायुतीची मरगळ पार झटकून टाकली आहे. राज्यात या योजनेच्या लाभासाठी बहिणींची एकच झुंबड उडाली आहे. त्यातून महायुतीला शंभर हत्तींचे बळ संचारले आहे. ही योजना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर इनकॅश करण्यासाठी आता महायुतीत रस्सीखेच सुरू झाली आहे. शिंदे सेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा पुढे केला आहे. अजितदादांनी गुलाबी वादळ आणलं आहे तर आता भाजपनं पण एक पाऊल पुढं टाकलं आहे.
स्त्री सक्षमीकरणाचा ध्यास
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विटरवर भाजपच्या नव्या अभियानाविषयी माहिती दिली आहे. केंद्रातील मोदी सरकार, राज्यातील महायुती सरकार आणि विशेषतः भारतीय जनता पक्ष हा स्त्री सक्षमीकरणाचा ध्यास घेऊन काम करत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यासाठी पक्ष, नेते, कार्यकर्ते अहोरात्र राब राबत असल्याचे त्यांनी सांगितले. विविध योजना व उपक्रमांच्या द्वारे स्त्रीला सशक्त करण्याचे काम पक्ष व सरकारद्वारे आम्ही करत आहोत, असे ते म्हणाले.
महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणी साधणार आपल्या लाडक्या देवाभाऊंशी संवाद!
स्त्रीसक्षमीकरण हा ध्यास घेऊन केंद्रातील मोदी सरकार, राज्यातील महायुती सरकार व विशेषतः भारतीय जनता पार्टी अहोरात्र मेहनत घेत आहे. विविध योजना व उपक्रमांच्या द्वारे स्त्रीला सशक्त करण्याचे काम पक्ष व… pic.twitter.com/5hoD2lJSni
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) August 13, 2024
लाडक्या बहिणींचा देवाभाऊ
बावनकुळे यांनी भाजपच्या नवीन उपक्रमाची माहिती दिली आहे. त्यानुसार, येत्या राखी पौर्णिमाला 18 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस “लाडक्या बहिणींचा देवाभाऊ” या उपक्रमाद्वारे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तर भाजप महिला मोर्चावर हा उपक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी आहे. आता थेट महिला वर्गाशी संवाद साधून त्यांच्या अडअडचणी आणि या योजनेचे फायदे सांगण्यात येणार आहेत.
विधानसभेच्या तोंडावर ब्रँडिंग
विधानसभा निवडणूक 2024 आता तोंडावर आली आहे. लोकसभेतील पराभावाचे मंथन केल्यावर महायुतीने लाडकी बहीण योजनेद्वारे ब्रँडिंग सुरु केले आहे. महायुतीमधील घटक पक्षांनी या योजनेच्या माध्यमातून एका मोठ्या वर्गाला खूष करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. एक हक्काची व्होट बँक बांधण्याचा हा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. तर लाडकी बहीण योजनेच्या श्रेयासाठी रस्सीखेच असल्याचे दिसून येते.