लाडकी बहीण योजनेने महायुतीचा सत्तेतील वाटा अधिक आश्वासक केला. सत्तेचं फळ महायुतीतील तीनही घटक पक्षांना चाखायला मिळाले. पण आता ‘गरज सरो नी वैद्य मरो’ अशी काहीशी अवस्था यातील काही बहिणींच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. ही योजना बंद करणार नाही असे आश्वासन महायुतीने प्रचार सभांमधून दिले होते. लाडकी बहीण योजनेत पूर्वी सरसकट अनेक महिलांचा समावेश करण्यात आला. आता योजनेसाठी अटी आणि शर्ती लागू करण्याचा फैसला सरकारने केला आहे. अटी आणि शर्ती लादण्याच्या या प्रकाराविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. आज खासदार प्रणिती शिंदे आणि विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी या योजनेवरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला. दोन्ही नेत्यांनी महायुती सरकारला खडेबोल सुनावले.
आताच अटी-शर्थी कशा आठवल्या?
सतेज पाटील यांनी लाडकी बहीण योजनेसाठी आता निकष लावण्याच्या निर्णयाचा चांगलाच समाचार घेतला. जेव्हा ही योजना सुरू झाली तेव्हा अर्थ खात्याने फाईलवर काय लिहिलं होतं? फाईलवर अटी व शर्ती घाला असं लिहिण्यात आलं होतं का? अटी व शर्ती घाला असे म्हणण्यात आले होते तर तेव्हा का घातला नाही? मग आता का घालत आहात? असा प्रश्नांचा भडिमार करत त्यांनी सरकारला जाब विचारला.
या अटी व शर्ती तुम्हाला आज आठवल्या का? सुरुवातीला बहिणींना दिवाळी भाऊबीज म्हणून पैसे दिले मग आता त्या बहिणी मधला दुरावा तुम्हाला दिसू लागला आहे का? आता यापैकी दोन लाडक्या बहिणी राहिलले आणि तीन नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का? ज्यांना आधी तुम्ही दिला आहे त्यांना आता पुन्हा तुम्हाला थांबवता येणार नाही. दिवाळी चांगल्या पद्धतीने साजरी केली असं तुम्ही जाहीरपणे सांगता मग आता भावाने त्याच बहिणींना वाऱ्यावर सोडणार आहेत का? असा सवाल करत त्यांनी जोरदार हल्लाबोल चढवला.
प्रणिती शिंदे यांचा हल्लाबोल
लोकसभेतील खासदार प्रणिती शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवरून सरकारला चांगलेच घेरले. या योजनेमुळे महाराष्ट्र दिवाळखोर झाल्याचे त्या म्हणाल्या. लाडकी बहीण ह्या निवडणुकींसाठी चुनावी जुमला होता, असा आरोप त्यांनी केला. लाडकी बहीण योजनेमुळे राज्य दिवाळखोर झाले.इतर योजनांचे पैसे थांबवले आहेत, तिजोऱ्या रिकाम्या पडल्या आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला.