मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध ‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यावर कोरानाचं संकट असल्याने यंदा मूर्तीची प्रतिष्ठापना न करता ‘आरोग्योत्सव’ साजरा करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. (Lalbaugcha Raja Ganeshotsav Mandal Decides to cancel Ganeshotsav)
कोरोनाच्या संकटामुळे यंदा गणेशमूर्तींच्या उंचीवरुन लागणारी चढाओढ टाळत अनेक मंडळांनी मूर्तीची उंची कमी करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, ‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने थेट गणपती बाप्पाची मूर्ती न बसवण्याचे ठरवले आहे. त्याऐवजी 11 दिवस रक्तदान आणि प्लाझ्मा थेरपी उपक्रम राबवला जाणार आहे. या निर्णयाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
कोरोना लढ्यात जे पोलीस जवान शहीद झाले आहेत त्यांच्या कुटुंबांचा सन्मान केला जाणार आहे. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 25 लाख रुपये देण्याची घोषणाही मंडळाने केली.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे 87 वे वर्ष. परंतु गणेशोत्सव मूर्ती स्थापना आणि विसर्जन असा कोणताही सोहळा साजरा न करता “आरोग्य उत्सव” म्हणून श्री गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत साजरा करण्यात येणार आहे.
“कोरोना संकट काळात डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय, पोलीस, पत्रकार, बेस्ट कर्मचारी सर्व काम करत आहेत. ते सातत्याने लढा देत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सवा संदर्भात बैठक झाली. यावेळी सर्वानुमते निर्णय झाला की, लालबागचा राजा हे कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान आहे. मात्र, गर्दी आणि संसर्ग वाढू नये यासाठी लालबागच्या राजाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करायची नाही.” अशी माहिती ‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.
सध्या महाराष्ट्र कोरोनाच्या संकटात सापडला आहे. गणेशोत्सव अगदी तोंडावर आला आहे. ‘लालबागच्या राजा’ला होणारी गर्दी लक्षात घेता मंडळाने परंपरेला छेद देत समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचं ठरवलं आहे.
‘लालबागच्या राजा’ची ख्याती सर्वदूर पसरली आहे. सर्वसामान्य नागरिकांपासून अनेक कलाकार, राजकारणी, क्रिकेटपटू लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात. इतकंच नाही तर देशविदेशातून भक्त बाप्पाच्या दर्शनासाठी येतात. अनेक तास रांगा लावून उभे राहतात. यंदा मात्र हा उत्सव होणार नाही.
हेही वाचा : ‘मुंबईच्या राजा’ची 22 फुटांची मूर्ती रद्द, ‘लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’चा निर्णय
याआधी, ‘मुंबईच्या राजा’ची 22 फुटांची मूर्ती रद्द करुन 3 फुटांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय झाला होता. मूर्ती लहान आणून उत्सवाची उंची वाढवण्याचे मंडळाने ठरवले होते. तर ‘परळचा राजा गणेश मंडळा’नेही 23 फुटांऐवजी 3 फुटांची गणेशमूर्ती बसवण्याचे ठरवले आहे.
VIDEO : Ashadhi Wari 2020 | विठ्ठला, कोरोनाच्या संकटातून जगाला सोडवं, विठूरायाकडे मुख्यमंत्र्यांच साकडं https://t.co/YKdkxkWFwg
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 1, 2020
चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा रद्द
गिरणगावातील 101 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ (चिंचपोकळीचा चिंतामणी) ने यंदा लोकभावनेचा विचार करुन तसंच सध्याची कोरोना परिस्थिती पाहता आणि पोलिसांवर असलेली जबाबदारी त्यांच्यावर गणेशोत्सवात अतिरिक्त ताण पडू नये म्हणून आगमन सोहळा रद्द करुन चिंतामणीच्या मंडपातच मूर्ती घडवण्याचा निर्णय घेतला आहे.
मूर्तीच्या उंचीबाबत शासन जे निर्देश देईल त्यानुसार, मूर्ती बनवण्यात येईल, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष उमेश सिताराम नाईक यांनी दिली होती. तसेच, मूर्ती जागेवर घडवण्यासाठी चिंतामणीच्या मूर्तीकार रेश्मा विजय खातू यांनी तयारी दर्शवली आहे. (Lalbaugcha Raja Ganeshotsav Mandal Decides to cancel Ganeshotsav)
संबंधित बातम्या :
23 फुटांऐवजी 3 फुटांची गणेशमूर्ती, ‘परळचा राजा गणेश मंडळा’चे चार स्तुत्य निर्णय
चिंचपोकळीच्या चिंतामणीची 100 वर्षांची परंपरा खंडित, आगमन सोहळा रद्द, मूर्तीबाबतही महत्त्वाचा निर्णय