मुंबई : ग्रामीण महाराष्ट्राची राज्यवाहीनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालपरी एसटीला महागाईच्या झळा बसत आहेत. एकीकडे उत्पन्न घटल्याने एसटीला ( MSRTC ) पगारासाठी सरकारी मदतीवर अवलंबून रहावे लागत आहे. त्यातच डिझेल ( diesel ) खरेदी करताना सरकारी ऑईल कंपन्या एसटीला नाडत आहेत. त्यामुळे आई जेवू घालीना आणि बाप भिक मागू देईना अशी एसटीची अवस्था झाली आहे.
एसटी महामंडळाकडे सध्या 16 हजार बसेसद्वारे 40 लाख प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. एसटीला दररोज 14 लाख लिटर डिझेल लागत असते.
एसटीला घाऊकदराने डिझेल मिळण्यासाठी मे.इंडीयन ऑईल तसेच भारत पेट्रोलियम या सरकारी कंपन्यांबरोबर करार करण्यात आला आहे. या कंपन्याबरोबर 11 जानेवारी 2019 ते 10 जानेवारी 2022पर्यंत घाऊक डिझेल खरेदीचा करार झाला होता. त्यास मुदतवाढ दिली आहे.
मात्र, मे.इंडीयन ऑईल कंपनीने दिलेल्या दरपत्रकाची तुलना करता खाजगी पंपावरील दर आणि महामंडळास घाऊक दराच्या नावाखाली दिलेले दर यात प्रति लीटर 22.61 रूपये जादा दराने एसटीला सरकारी तेल कंपन्या डिझेल पुरवठा करीत असल्याचे उघडकीस आले आहे.
घाऊक आणि किरकोळ विक्री दरात असलेल्या असलेल्या फरकाने महामंडळावर आर्थिक भार वाढत आहे. त्यामुळे महामंडळाने तेलपुरवठा कंपनीकडून डीझेल खरेदी करण्याऐवजी बाजारातून किरकोळ पद्धतीने डिझेल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
एसटी महामंडळाने विभागात डिझेल भरण्यासाठी आगारातील बसेसच्या वेळापत्रकाचा विचार करून नजिकच्या सोयीस्कर पंपाची निवड करण्यात यावी, त्यामुळे डिझेल अभावी बसेस बंद राहण्याचा धोका टळेल असे म्हटले आहे. ज्या मार्गावर जादा फेऱ्या आहेत अशा मार्गांवरील पंपांची निवड करण्यात यावी असे महामंडळाने सूचना केल्या आहेत.
विविध पेट्रोलियम कंपन्यांकडून एसटीला डिझेल घाऊक दराने पुरवण्यात येते होते. मात्र, या कंपन्यांनी महामंडळासोबत केलेल्या अटीशर्तींमध्ये बदल केला आहे.
एसटी महामंडळाला विविध सरकारी पेट्रोलियम कंपन्यांतर्फे पुरविण्यात येणारे डिझेल खासगी पेट्रोल पंपावरील डिझेलच्या दरापेक्षा प्रचंड महाग मिळत आहे.
सरकारी कंपन्यांकडून डिझेल खरेदी करताना लिटरमागे 22 ते 23 रुपये अतिरिक्त पैसे मोजावे लागत असल्याने महामंडळाने या कंपन्यांकडून डिझेल न घेता खासगी पेट्रोलपंप चालकांकडून एसटीत डिझेल भरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एसटीची बचत होत आहे.
एसटीही सार्वजनिक परिवहन सेवा असताना केंद्राची मालकी असलेल्या सरकारी पेट्रोलियम कंपन्यांकडून एसटीला इतराहून स्वस्त डिझेल पुरविण्याऐवजी महागदराने कशा काय डिझेल पुरवित आहेत असा सवाल महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.