मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे राज्यातील सामाजिक वातावरण बिघडत चालल्याने विरोधकांकडून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. संत परंपरा लाभलेल्या अठरा पगड जातीच्या महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून धर्मांध प्रवृत्तीच्या काही समाज कंटकांकडून खतपाणी घालून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडत असल्याने या प्रकरणात लक्ष घालून या सर्व घटनांची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यपाल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारव टीका करताना म्हटले आहे की, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा,संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आहे. त्यामुळे येथील सर्वधर्मीय समाज गुण्यागोविंदाने राहत आहे.
परंतु राज्यात गेल्या काही महिन्यांपासून व गेल्या आठवड्याभरात सतत काही असामाजिक प्रवृत्तींकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करून दंगली घडविण्याचे प्रकार सुरू आहेत. राज्यात दररोज एका शहरात दंगल घडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे राज्यात अशांतता पसरविण्याचे काम काही लोकांकडून सुरू आहे. राज्यातील दंगलसदृश्य परिस्थिती सध्या वेगळी परिस्थिती आहे. तर राज्याचे राज्यपाल म्हणून आपण या गंभीर विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे दानवे यांनी पत्राद्वारे सांगितले आहे.
राज्यात जातीय सलोख्याची गरज असून गेल्या अडीच ते तीन महिन्यांत राज्याच्या विविध भागात 8 घटनाहून अधिक जातीय तणाव आणि हिंसाचाराचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी अचानक औरंगजेबाचे फोटो ठेवून उदात्तीकरण केले गेले आणि त्यातूनही जातीय तणाव वाढल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.
राज्यात पोलीस यंत्रणा असली तरी या अशा प्रकारच्या घटना रोखण्यात सरकारला अपयश येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.त्यामुळे या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्याची मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.