महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील अखेरच्या टप्प्याला आता सुरुवात झाली आहे. मतदानाला उणेपुरे पाच दिवस उरले आहेत. त्यातच भाजपाने हिंदुत्वाचे कार्ड खेळल्याने महायुतीमधील एक गट नाराज झाला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटोंगे तो कटोंगे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक है तो सेफ है असा नारा दिला. त्यावरून राज्यातील वातावरण ढवळून निघाले. मराठा-ओबीसी या वादाला काऊंटर करण्यासाठी हिंदुत्वाचे कार्ड खेळण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान महायुतीमधील अजितदादा गट या घोषणेवर नाराज आहे. अजितदादांनी महाराष्ट्रात अशा घोषणांची गरज नसल्याचे फटकारले. तर आता त्यांच्या जवळच्या एका शिलेदाराने भाजपाने वादग्रस्त मुद्यावर राजकारण सोडले नाही तर महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी होणार नसल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे महायुतीमधील नाराजी थेट चव्हाट्यावर आली आहे. तर भाजपाची मोठी कोंडी झाल्याचे दिसत आहे.
बटेंगे तो कटेंगे
भाजपाचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गेल्या आठवड्यात वाशीम येथील जाहीर सभेत बटेंगे तो कटेंगे अशी घोषणा दिली होती. भाजपाने निवडणुकीत हिंदूत्व कार्ड खेळल्याचे मानले जात होते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पहिल्याच प्रचार सभेत एक है तो सेफ है असा नारा दिला. त्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले. महाविकास आघाडीने या दोन्ही नाऱ्यावर सडकून टीका केली.
तर दुसरीकडे महायुतीच या घोषणेवरून ठिणगी पडली. अजितदादांनी या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. महाराष्ट्र हा शाहु-फुले-आंबेडकरांचा आहे. येथे शिवरायांची शिकवण आहे. साधु-संतांची पंरपरा आहे. राज्यात अशा वक्तव्याला थारा नसल्याचे त्यांनी जाहीर केले. तर दुसरीकडे भाजपाच्या पंकजा मुंडे यांनी पण असेच वक्तव्य केले. त्यानंतर त्यांनी त्यावर खुलासा दिला. तर आता अजितदादांच्या शिलेदाराने थेट काडीमोड घेण्याचा इशारा दिला आहे.
नवाब मलिक यांचा थेट इशारा
मानाखूर्द-शिवाजीनगर या मतदारसंघात महायुतीतच टफ फाईट आहे. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे नवाब मलिक या मतदारसंघातून मैदानात उतरले आहे. नवाब मलिक यांनी बटोंगे तो कटोंगे या नाऱ्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. भाजपाने वादग्रस्त मुद्दावर राजकारण थांबवलं नाही तर आम्ही महायुतीच्या नवीन सरकारमध्ये नसू असा थेट इशाराच त्यांनी दिला. टीआयओला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्यांवर रोखठोक विचार मांडले.