मुंबई : टाटा उद्योगसमुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघर चारोटी परिसरात सूर्या नदी पुलावर त्यांचा साडे तीनच्या दरम्यान हा अपघात (Accident) झाला. यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. चालकही गंभीर जखमी झाला आहे. मर्सिडिज गाडी डिव्हाडरला धडकली. वेगावर नियंत्रण नसताना हा अपघात झाल्याचे स्पष्ट होत आहे. दुर्दैवाने या अपघातात प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा मृत्यू झाला आहे. सायरस मिस्त्री यांची ओळख एक यशस्वी उद्योगपती अशी होती. त्यांचा जन्म 4 जुलै 1968 साली झाला होता. 28 डिसेंबर 2012 रोजी त्यांना टाटा समूहाचे अध्यक्षपद (Chairman of the Tata Group) देण्यात आले होते. त्यानंतर 24 ऑक्टोबर 2016 रोजी त्यांना या अध्यक्षपदावरून हटवण्यात आले होते. ते टाटा समुहाचे सहावे अध्यक्ष होते. त्यानंतर हा वाद कोर्टातही गेला होता. भारतात आणि इंग्लंडमध्येही सर्वाधिक महत्त्वाचे उद्योगपती अशा पदवीने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
प्रसिद्ध उद्योगपती पालनजी मिस्त्री आणि पैटसी पेरीन यांचे ते सर्वात लहान पुत्र होते. वकील इकबाल छागला यांची मुलगी रोहिका छागला यांच्याशी सायरस यांचा विवाह झाला होता. मिस्त्री यांना दोन मुले आहेत. फिरोज मिस्त्री आणि जहान मिस्त्री अशी त्यांची नावे आहेत.
सायरस मिस्त्री यांच्या वडिलांचे नाव पालोनजी मिस्त्री, त्यांच्या आईचे नाव पॅटसी पेरिन दुबाश, जे आयर्लंडचे होते. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमधून घेतले. त्यांनी 1990मध्ये इंपीरियल कॉलेज लंडन, लंडन विद्यापीठातून सिव्हिल इंजिनीअरिंग केले आणि त्यानंतर 1996मध्ये लंडन विद्यापीठातून लंडन बिझनेस स्कूलमधून व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले. भारतासोबतच त्यांनी आयर्लंड देशाचेही नागरिकत्व घेतले.
सायरस मिस्त्री हे शापूरजी पालोनजी अँड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. तो त्यांचा कौटुंबिक व्यवसाय आहे. यासोबतच सायरस मिस्त्री यांनी 2012 ते 2016 या काळात टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. सायरस मिस्त्री यांचे आजोबा शापूरजी मिस्त्री यांनी 1930मध्ये त्यांचा कौटुंबिक व्यवसाय सुरू केला. त्याच वेळी त्यांनी दोराबजी टाटा यांच्याकडून टाटा समूहातील भागभांडवल विकत घेतले होते. त्यांनी टाटा समूहातील 18.5% हिस्सा खरेदी केला होता. मिस्त्री कुटुंब हे एकमेव कुटुंब आहे, ज्यात त्यांनी टाटा समूहात भागीदारी केली आहे. याशिवाय 66% हिस्सा टाटा समूहाच्या विविध ट्रस्टकडे आहे.
सायरस मिस्त्री हे टाटा समूहाचे सहावे चेअरमन होते आणि (पूर्वी नौरोजी सकलातवाला) हे दुसरे चेअरमन होते, ज्यांच्या नावावर टाटा नव्हते. मिस्त्री 1 सप्टेंबर 2006 रोजी टाटा सन्सच्या बोर्डात रुजू झाले त्याआधी त्यांच्या वडिलांनी निवृत्ती घेतली होती. त्यांनी 24 सप्टेंबर 1990 ते 26 ऑक्टोबर 2009पर्यंत टाटा अॅलेक्ससी लिमिटेडमध्ये काम केले आणि 18 सप्टेंबर 2006पर्यंत टाटा पॉवर कंपनी लिमिटेडमध्ये संचालक म्हणून काम केले. 2013मध्ये त्यांना टाटा समुहाचे अध्यक्ष बनवण्यात आले आणि त्याचवेळी ते टाटा समूहाच्या टाटा इंडस्ट्रीज, टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा पॉवर, टाटा टेलिसर्व्हिसेस, इंडियन हॉटेल्स, टाटा आदी कंपन्यांचे अध्यक्ष राहिले.
24 ऑक्टोबर 2016 रोजी टाटा समूहाच्या बोर्ड सदस्यांनी सायरस मिस्त्री यांना टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून हटवले आणि त्यानंतर टाटा समुहाच्या बोर्ड सदस्यांनी रतन टाटा यांना पुन्हा एकदा अध्यक्ष बनवले. मिस्त्री यांना टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून हटवण्यामागचे कोणतेही अधिकृत कारण समोर आलेले नाही. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सायरस मिस्त्री अध्यक्ष झाल्यानंतर टाटा समुहाचा कोणताही निर्णय मंडळाच्या सदस्यांशी सल्लामसलत न करता घेण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यांना अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर ते न्यायालयात गेले, मात्र न्यायालयाने त्यांचा दावा फेटाळून लावला. आज टाटा समुहाचे नवे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन आहेत. 2017पासून टाटा समुहाचे अध्यक्षपद ते सांभाळत आहेत.