लाईट, कॅमेरा, अ‍ॅक्शन, फिल्म शुटींगने पश्चिम रेल्वेची बंपर कमाई

| Updated on: Apr 10, 2023 | 7:53 PM

पश्चिम रेल्वेला चित्रपट शुटींगमधून बक्कळ कमाई झाली आहे. रेल्वे स्थानक, रेल्वे कोच आणि ऐतिहासिक रेल्वे इमारती चित्रपटांच्या शुटींगसाठी भाड्याने दिल्याने ही कमाई झाली आहे.

लाईट, कॅमेरा, अ‍ॅक्शन, फिल्म शुटींगने पश्चिम रेल्वेची बंपर कमाई
FILM SHOOTING
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : रेल्वे आणि भारतीय सिनेमाचे वेगळेच नाते आहे. कोणताही चित्रपट  रेल्वे गाडी तसेच रेल्वे स्थानक दाखविला शिवाय खरा वाटतच नाही. इतकी भारतीयांची नाळ रेल्वे आणि सिनेमाशी जुळलेली आहे. त्यामुळे रेल्वेचे डब्बे, रेल्वेच्या ऐतिहासिक इमारती, रेल्वे स्थानके इतकेच काय मालगाड्यांच्या यार्डाना चित्रपटाच्या शुटींगकरीता खूप मागणी असते. यंदाच्या आर्थिक वर्षांत पश्चिम रेल्वेने चित्रपटांच्या शुटींगद्वारे तब्बल आतापर्यंतची सर्वाधिक रेकॉर्डब्रेक 1.64 कोटींची कमाई केली आहे.

रेल्वेच्या परिसरात चित्रपटांच्या चित्रीकरणाला काही नियम अटीवर परवानगी दिली जाते. त्याद्वारे रेल्वेला त्याचे भाडे मिळत असते. मध्य रेल्वे प्रमाणेच पश्चिम रेल्वेवर देखील अनेक लोकप्रिय चित्रपट शुटींगची स्थळे आहेत. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकानूसार यंदा पश्चिम रेल्वेच्या विविध लोकेशनवर विविध भाषेतील एकूण 20 चित्रपटाचे शुटींग झाले. त्यात चित्रपट, वेब सिरीज, टीव्ही कमर्शियल जाहीराती, टीव्ही मालिका, माहितीपट आणि सामाजिक फिल्मचा समावेश आहे. याद्वारे यंदाच्या संपलेल्या आर्थिक वर्षे 2022-23 मध्ये पश्चिम रेल्वेला एकूण 1.64 कोटी रूपयांची कमाई झाली आहे.

पश्चिम रेल्वेला गेल्यावर्षी 2021-22 मध्ये चित्रपट शुटींगमधून 67 लाखाची कमाई झाली होती. तर साल 2019 – 20 या आर्थिक वर्षात 1 कोटींची तर साल 2018 – 19 मध्ये 1.31 कोटी रूपयांची कमाई झाली होती. 2020-2021 मध्ये कोरोनामुळे कमाईवर मोठा परिणाम झाला. परंतू कोरोना ओसरल्यानंतर पुन्हा चित्रपटाचे शुटींगमध्ये वाढ होऊन कमाईमध्ये वाढ होण्यास सुरूवात झाली.

पश्चिम रेल्वेवर अनेक प्रसिद्ध ब्लॉकबास्टर चित्रपटाचे शुटींग झाले आहे. त्यात लंच बॉक्स, हिरो पंती – 2, गब्बर इज बॅक, एअर लिफ्ट, पॅडमॅन, रा वन, एक व्हिलन रिर्टन, यह जवानी हे दिवानी, राधे, लक्ष्मी बॉम्ब, काय पोचे, घायल रिर्टन, कमिने, हॉलिडे, डी-डे, शेरशाह, बेलबॉटम, मराठी चित्रपट आपडी धापडी, गुजराती चित्रपट कच्छ एक्सप्रेस आणि लोचा लाप्सी आदी चित्रपटाचे शुटींग झाले आहे.

ही ठिकाणे लोकप्रिय

सिनेमा शुटींगसाठी मुंबई सेंट्रल टर्मिनस, चर्चगेट मुख्यालय, चर्चगेट स्टेशन इमारत, साबरमती क्रीडा मैदान, गोरेगाव स्थानक, जोगेश्वरी यार्ड, लोअरपरळ वर्कशॉप, कांदिवली आणि विरार कारशेड, केळवे रोड, पार्डी, काळाकुंड, पातळपाणी रेल्वे स्टेशन येथे सर्वाधिक सिने शुटींग होत असते. मुंबई सेंट्रल, वलसाड आणि गोरेगाव येथे चालत्या ट्रेनमध्ये शुटींगची सोय आहे. जोगेश्वरी यार्डात मालगाडी आणि मेल-एक्सप्रेसमध्ये चित्रीकरण करायला मिळते.

 सिंगल विंडोची सोय

चित्रपटांना शुटींग परवानगीसाठी कागदपत्रे आणि इतर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सिंगल विंडो सुरू केल्याने काम झटपट होत आहे. त्यामुळे प्रोडक्शन हाऊसना झटपट कागदपत्रीय सोपस्कार पूर्ण करण्यास मदत मिळत आहे. त्यामुळे चित्रपटांच्या शुटींगसाठी अर्ज करणाऱ्यांचा फायदा होत असून रेल्वेलाही घसघशीत उत्पन्न मिळत आहे.