मुंबई : दरवाजात हाताची बोटे अडकल्याने प्रायमरीत शिकणाऱ्या एका अडीच वर्षांच्या मुलीवर शस्रक्रीया करावी लागल्याची दुर्दैवी घटना मालाडच्या एका नर्सरी स्कूलमध्ये घडली आहे. या मुलीच्या वडीलांनी या प्रायमरी नर्सरी शाळेविरोधात हलगर्जीचा गुन्हा दाखल केला आहे.
मालाडच्या युरोकीड्स प्रीस्कूलमध्ये शिकणाऱ्या एका अडीच वर्षीय मुलीच्या हाताच्या मधल्या आणि त्याच्या शेजारील बोटांवर प्लास्टीक सर्जरी करावी लागली आहे. या प्रकरणी या शाळेविरोधात हलगर्जीचा गुन्हा या मुलीचे पालक सचिन जैन यांनी दींडोशी पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.
या प्रकरणात सुरूवातीला या मुलीच्या शिक्षेकेने या मुलीच्या चुकीमुळेच दारात बोटे अडकली गेल्याचा दावा केला होता. परंतू या मुलीशी पालकांनी बोलल्यावर त्यांना संशय आला. त्यामुळे या मुलीच्या पालकांनी संबंधित शाळेचे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली. या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करता वर्ग शिक्षेकेच्या हलगर्जीने वर्गाचा दरवाजा बंद करताना हा अपघात घडल्याचे स्पष्ट झाले. या घटनेवेळी ही मुलगी दरवाजाकडे येत असल्याचे माहीती असतानाही शिक्षकेने दुर्लक्ष केले. तसेच तीव्र वेदनेने मुलगी किंचाळली असतानाही या मुलीकडे शिक्षकेने दुर्लक्ष केल्याचे सीसीटीव्हीतून स्पष्ट झाले आहे.
नर्सरी शाळेच्या प्रशासनाने सहकार्य न केल्यानेच अखेर आपण गुन्हा दाखल केल्याचे तिचे वडील जैन यांनी म्हटले आहे.या नर्सरी शाळेच्या प्रमुख राजेश्वरी गोविंद यांनी हा अपघात घडल्याचे मान्य केले आहे. हा एक दुर्दैवी अपघात आहे. आमची पालकांशी सहानुभूती असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणाचा तपास सुरू असून अद्याप कुणालाही अटक केली नसल्याचे त्यांनी सांगितले.