भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येत्या ६ डिसेंबर २०२४ रोजी राज्य शासनाने मुंबई शहर आणि उपनगर जिल्हा येथे स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सहा डिसेंबर रोजी सुट्टी असणार आहे. यापूर्वी १८ डिसेंबर १९९६ रोजीच्या परिपत्रकानुसार मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील शासकीय-निमशासकीय कार्यालयाना दरवर्षी अनंत चतुर्दशी आणि साल २००७ पासून गोपाळकाळा ( दहीहंडी ) निमित्ताने मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांसाठी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. आता साल २०२४ पासून मुंबई आणि उपनगर जिल्ह्यातील सर्व कार्यालयांना तिसरी सुट्टी जाहीर केलेली आहे.
येत्या ६ डिसेंबर २०२४ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या लाखो अनुयायांची गैरसोय होऊ नये म्हणून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल एक बैठक घेतली. यावेळी त्यांनी अनुयायांना शिस्तबद्ध पद्धतीने डॉ. बाबासाहेबांच्या चैत्यभूमीतील स्मारकाचे दर्शन घेता यावे यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे असे आदेश दिले आहे. दरम्यान, महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर २०२४ रोजी मुंबईत स्थानिक सुटी जाहिर करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांची संख्या दरवर्षी वाढत आहे. त्यांना मुंबई महानगर पालिका आणि इतर संस्थांमार्फत भोजन, स्वच्छ आणि पुरेशी स्वच्छतागृहे, वैद्यकीय सुविधा, राहण्याची सुविधा, वाहतूक व्यवस्था, मदत आणि समन्वय कक्ष, सुरक्षा व्यवस्था आदी सोयी सुविधा पुरविण्यात येतात. या सुविधा पुरविताना कोणत्याही अनुयायाची गैरसोय होणार नाही, याची सर्व संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असेही काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. महापरिनिर्वाण दिनाशी संबंधित सर्व समित्यांचे नेहमीच सहकार्य राहिले आहे, त्यांच्या सूचनांची दखल घेऊन सर्व कामे तातडीने पूर्ण करावीत. हेलिकॉप्टरद्वारे चैत्यभूमीवर पुष्पवृष्टी करण्याचे नियोजन करण्यात यावे. परिसरात पूर्ण स्वच्छता राखण्यात यावी. विविध रेल्वे स्थानकांवर मदत कक्ष उभारण्यात यावेत, अशा सुचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या.
दादर चैत्यभूमी आणि दादर चौपाटीला दरवर्षी चांगली सुविधा देण्यात येते. यावर्षीही कोणतीही कमतरता राहणार नाही, यासाठी सर्वांनी समन्वयाने प्रयत्न करावेत. भोजन, आरोग्य, पाणी, स्वच्छता तसेच सुरक्षा आदी सुविधा दर्जेदार द्याव्यात. स्थानिक समित्यांचे नेहमीच सहकार्य मिळते. त्यांच्या सूचनांही योग्य प्रकारे अमलात आणाव्यात आणि योग्य नियोजन करावे असे भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दूरदृश्यप्रणालीद्वारे सांगितले.