मुंबई : राज्यात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि स्थानिक पातळीवर महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत. काही ठिकाणी अंशत: तर काही भागात कडक लॉकडाऊनची घोषणा पालकमंत्री किंवा जिल्हा प्रशासनानं केली आहे. त्यामुळे नागरिकांना पुन्हा एकदा कडक निर्बंधांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर नागरिकांनी बाजार, लग्न समारंभ, राजकीय कार्यक्रम अशा ठिकाणी मोठी गर्दी करायला सुरुवात केली. त्याचा परिणामस्वरुप पुन्हा एकदा रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.(lockdown in maharashtra nagpur kalyan dombivli latest news updates)
राज्यात नागपूर, पुणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, औरंगाबाद आदी ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून कठोर निर्बंध लादण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. दुसरीकडे कल्याण-डोंबिवली भागातही कठोर निर्बंध लादण्यात येत आहेत.
नागपूरमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने पुन्हा लॉकडाऊन करण्याची घोषणा पालकमंत्री नितीन राऊत यांनी केली. नागपूरमध्ये 15 ते 21 मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात येईल, असं नितीन राऊत म्हणाले. “नागपुरातच नाही तर ग्रामीण भागात सुद्धा रुग्ण आढळून येत आहेत. शनिवार-रविवार बंदला म्हणजे मिनी लॉकडाऊनला प्रतिसाद मिळाला नाही. बाधित रुग्ण बाहेर पडत असल्याची माहिती आहे. त्यामुळे लॉकडाऊन करावा लागत आहे”, असं नितीन राऊत यांनी सांगितलं.
Maharashtra | Complete lockdown to remain imposed in Nagpur City Police Commissionerate area from March 15 to March 21. Essential services will continue: Nagpur Guardian Minister Nitin Raut#COVID19
— ANI (@ANI) March 11, 2021
मद्य विक्री बंद
डोळ्यांचे दवाखाने, चष्म्याची दुकानं सुरु
लसीकरण सुरु राहणार
खासगी कंपन्या बंद, सरकार कार्यालये 25 टक्के कर्मचाऱ्यांसह सुरु राहणार
कल्याण-डोंबिवली परिसरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कठोर निर्बंध लादले आहेत. प्रशासनाने दिलेल्या नियमानुसार आता कल्याण-डोंबिवली परिसरातील दुकारे सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या वेळेतच सुरु राहणार आहेत. शनिवार आणि रविवार P-1 आणि P-2 यानुसार दुकाने सुरु ठेवण्यात येतील. खाद्यपदार्थ आणि शीतपेयाच्या गाड्या रात्री 7 वाजेपर्यंतच सुरु राहतील. भाजी मंडई 50 टक्के क्षमतेनं सुरु राहील.
लग्न आणि हळदी समारंभ सकाळी 7 ते संध्याकाळी 9 या वेळेत आखून दिलेल्या मर्यादेनुसारच करण्यात यावेत. अन्यथा वर-वधू आणि हॉल मालकाविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्याचबरोबर केडीएमसी परिसरातील बार रात्री 11 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. होम आयसोलेशनमध्ये असणारा रुग्ण बाहेर फिरताना आढळून आल्यास कारवाई करण्यात येणार आहे.(lockdown in maharashtra nagpur kalyan dombivli latest news updates)
औरंगाबादमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. त्याचबरोबर रुग्णसंख्येतही मोठी वाढ होताना दिसत आहे. अशावेळी औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. वेरुळ-अजिंठा लेणीसह औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळं 4 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. दरम्यान, औरंगाबादेत मध्यरात्रीपासून अंशत: लॉकडाऊन सुरु करण्यात आला आहे. त्यानुसार सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंतच बाजारपेठा सुरु राहणार आहेत. गर्दी होणारे सर्व कार्यक्रम आणि शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. इतकंच नाही तर नियम मोडणारी दुकाने लॉकडाऊन संपेपर्यंत सील करण्यात येतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
पुण्यातील आयसर आणि टाटा इन्स्टिट्यूटनं विभागीय आयुक्त कार्यालयाला बुधवारी एक सुधारित अहवाल दिला आहे. त्यात निर्बंध कठोर करण्याची गरज असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. उद्या पालकमंत्री अजित पवार यांची प्रशासनासोबत एक महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत निर्बंधाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाला दिलेल्या अहवालात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकानं आणि चित्रपटगृहे बंद ठेवण्यात यावेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करावी. शक्य असलेल्या क्षेत्रात वर्क फ्रॉम होम सुरु करावं. सार्वजनिक कार्यक्रम आणि राजकीय सभा, संमेलनाला स्थगिती देण्यात यावी, असं नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे पुणेकरांवर लॉकडाऊनची टांगती तलवार असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे.
शिमग्याला कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची तपासणी केली जाणार आहे. जिल्ह्याच्या सीमेवर तपासणी नाके उभारण्यात येणार आहेत. प्रत्येकाची तपासणी करुनच चाकरमान्यांना जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी तशी माहिती दिली आहे. येत्या दोन दिवसांत प्रशासन त्याबाबत आदेश काढणार आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गणेशोत्सवाप्रमाणे होळीलाही नियमावली लागू करण्यात आली आहे. गणेशोत्सवाप्रमाणेच होळीलाही लाखो चाकरमाणी कोकणात जात असतात. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
धुळे जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत आहे. धुळे जिल्हायात कोरोनाचे 398 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. त्याचबरोबर शिंदखेडा तालुक्यातील निमगुल आणि चिमठाणे गाव कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येक रविवारी जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्याचबरोबर धार्मिक स्थळं आणि सर्व आठवडी बाजार, मंगल कार्यालयं बंद करण्याचा निर्णयही घेतला गेला आहे. तेरमधील संत गोरोबा काका समाधी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वारकरी आणि भाविकांना दर्शन घेता येणार नाही.
संबंधित बातम्या :
Nagpur Lockdown: 15 मार्चपासून कडक निर्बंध, मात्र नागपुरातील लॉकडाऊनला भाजपचा विरोध
COVID-19 Vaccine | पंतप्रधान मोदी यांच्या आईने घेतली कोरोना लस, मोदी म्हणतात…
lockdown in maharashtra nagpur kalyan dombivli latest news updates