लोकसभा निवडणुकीत अनेक मुद्यांवरुन वातावरण तापले आहे. आरोपांच्या फैरी झडत आहे. सर्वच मुद्यांची जी काही सरमिसळ झाली आहे. त्यामध्ये आता मंगळसूत्राने निवडणूकीची सूत्र हाती घेतल्याचे चित्र आहे. दोन दिवसांपासून देशासह राज्यात सौभाग्याचं लेणं निवडणुकीच्या केंद्रस्थानी आले आहे. मंगळसूत्राच्या मुद्यासह इतर मुद्यावरुन खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील निवडणूक सभेत काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यात काँग्रेस आई-बहिणींचे मंगळसूत्र पण शिल्लक ठेवणार नाही, अशी टीका त्यांनी केली होती. त्यानंतर त्यावर देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.
काय म्हणले संजय राऊत
पंतप्रधानांच्या मंगळसूत्रवरील वक्तव्यानंतर विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. हा मुद्दा आता निवडणुकीच्या केंद्रस्थानी आला आहे. नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणात उगाच उठाठेव करु नये, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. मणिपूरला किती महिलांची मंगळसूत्र गेली असा सवाल विचारला.
राम मंदिर आंदोलनात हे कुठे होते?
अयोध्यात जेव्हा आंदोलन सुरु होत तेव्हा हे डरपोक कुठे होते,रामाच्या साहाय्याने हे निवडणुका जिंकायला बघत आहेत, त्यांची शेवटची फडफड सुरु आहे, अशी टीका संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर केली. देशात हे आंदोलन असतांना शिवसेना त्या आंदोलनात उतरली होती. अमित शहाच्या पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं होत कि हे कृत्य शिवसेनेने केलं होत तेव्हा बाळासाहेबांनी त्याची जवाबदारी घेतली होती, तेव्हा अमित शहा तरी होते का, असा टोला ही त्यांनी लगावला.
ही तर साखर कारखान्यांना लाचच
साखर कारखान्यांना निवडणुकीच्या आधी दिलेला निधी म्हणजे लाच असल्याचा आरोप त्यांनी केला. साखर कारखान्यांना लोकसभा निवडणुकीच्या अगोदरच कसा निधी देण्यात आला, यावर त्यांनी भाष्य केले. त्यांनी यावेळी निवडणूक आयोगाला पण कटघऱ्यात उभे केले. आता कुठे आहे निवडणूक आयोग, असा सवाल त्यांनी केला.
शिंदे-पवार यांच्यावर टीका
4 जूननंतर लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती येईल. त्यानंतर एकनाथ शिंदे गट पूर्णपणे संपलेला असेल, त्यांचा एकही खासदार निवडून येत नाही, अजित पवार आणि एकनाथ शिंदे संपलेले असतील, अशी टीका संजय राऊत यांनी केली.