लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यातील रणधुमाळीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नाशिकमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसवर वाग्बाण सोडले. त्यांनी दोघांवर तुफान हल्लाबोल चढवला. अखेरच्या टप्प्यातही आरोपांची राळ उठली आहे. तर शब्दांना धार चढली आहे. नकली शिवसेनेने काँग्रेससमोर गुडघे टेकविल्याचा आरोप मोदींनी केला होता. त्यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
हे तर चोरांचे साथीदार
हे चोर लोकं बोलत आहे, ज्यांनी पार्टीवरती डाका टाकला. यांनी मान्य केलं की चोरी केली आहे. हे कसे लोक आहेत जे पार्टी चोरी करतात आणि वरतून बोलतात,असा चिमटा राऊतांनी काढला. चोराला मदत करणारे पंतप्रधान, गृहमंत्री, निवडणूक आयोग हे लोक चोरांचे साथीदार असल्याचा आरोप त्यांनी केला. हेच लोक चोरांचे सरदार आहेत. त्यामुळे आम्हाला देशात परिवर्तन आणायचा आणि देशाचे संविधानाचा बचाव करायचा आहे. 4 जून रोजी सर्व चित्र स्पष्ट होईल असा टोला त्यांनी लगावला.
लोकांची झाली गैरसोय
एका माणसाचा प्रचार सुरळीत व्हावा यासाठी लोकांच्या गैरसोय करणारा पंतप्रधान पहिल्यांदा पाहिला. मोठा होर्डिंग पडून ज्या ठिकाणी सतरा लोकांचा जीव गेला त्या ठिकाणी प्रधानमंत्री रोड शो करतात. हे सगळं कोणासाठी अशा प्रकारचा प्रचार कधी देशात झाला नव्हता, असे कोणतेही पंतप्रधान या आधी पाहिले नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.
ही बापाची आघाडी
4 जून नंतर या देशात भाजपाचे अस्तित्व राहणार की नाही हा मोठा प्रश्न आहे. परंतु विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीला सन्मानाचे पद मिळावे ही अपेक्षा आहे.ममता बॅनर्जी आमच्या सोबत आहेत. त्या सुद्धा नरेंद्र मोदींना विरोध करत आहेत जे काय होईल ते सोबत होईल. ही पापाची आघाडीने नाही तर यांच्या बापाची आघाडी आहे येणाऱ्या काळात हे त्यांना कळेल.
राज्यातील सरकार घटनाबाह्य
हे सरकार एक घटनाबाह्य सरकार आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्री प्रचार करतात. घटना बाह्य उपमुख्यमंत्री प्रचार करत आहेत.जे दोन घटना बाह्य पक्ष बरखास्त व्हायला पाहिजेत. घटनेतील दहाव्या शेडूलनुसार ते बरखास्त झाले पाहिजेत. ते प्रचार करत आहेत ज्या घटनेचे रक्षण केले पाहिजे. सर्वोच्च न्यायालय यावर तारीख देत आहेत.म्हणून आम्ही संविधान बचावाची लढाई या लोकसभेमध्ये लढत असल्याचे राऊत म्हणाले.